रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:14+5:302021-02-05T07:47:14+5:30
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला गोंदिया : शहरासह जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लॅस्टिकचा कचरा दिसत ...

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला
गोंदिया : शहरासह जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लॅस्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणातहोणारी वाढ थांबविण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
महामार्गावरील अंडरपास मार्ग प्रलंबित
सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वरील डोंगरगाव डेपो, सशीकरण पहाडी व डुग्गीपार परिसरात विविध जातीच्या वन्यजीव प्राण्यांना रस्ते अपघातात नेहमीच जीव गमवावा लागतो. करिता अंडरपास मार्गाची मागणी केली जात आहे. हा रस्ता प्रलंबित असल्याने मात्र वन्यजीवांना नाहक जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अंडरपास मार्ग लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी केली जात आहे.
बनगाव येथे घाणीचे साम्राज्य
आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक ६ मधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचरापेटी लावण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता नगर प्रशासनाने प्रभागात लक्ष केंद्रित करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : गोंदिया- आमगाव राज्यमार्गावर किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. जनप्रतिनिधी नेहमी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण होत आहे.
सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले; परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली असून, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
घोगरा ते पाटीलटोला रस्त्याची दुर्दशा
मुंडीकोटा : येथून जवळ असलेल्या घोगरा ते पाटीलटोला (नवेगाव) या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पाच वर्षांपूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण झाले होते. मात्र अल्पावधीतच हा रस्ता पूर्णपणे उखडला असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावर ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाटीलटोला येथे झांझरिया कंपनी आहे. त्यामुळे घोगरा येथील मजूर त्या कंपनीत कामावर जात असतात. त्यांना रात्री-बेरात्री कामावर जाताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे तारेवरची कसरत करावी लागत असून, त्रास सहन कराव लागतो. पाटीलटोला येथून सरळ रस्ता (नवेगाव) खुर्द येथे व येडमाकोटा फाट्याला हा रस्ता जोडला आहे. या ठिकाणातून एसटी बस गोंदिया ते नागपूरकडे धावतात.
बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू
गोरेगाव : शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. या स्थानकात आजघडीला कुणीही कर्मचारी राहात नाही. तसेच गोरेगाव मार्गे जाणाऱ्या बससे स्थानकात येत नाही. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात स्थानकाची बांधणी झाल्यावर बऱ्याच दिवसांनी बसथांबा होता. पण आजघडीला या स्थानकात बसचा थांबा नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेला निवारा शेड शोभेची वास्तू ठरत आहे. या स्थानकात एसटीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
दिव्यांग- निराधारांवर उपासमारीची वेळ
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, विधवांना, आर्थिक कुंटुब सहाय्यांना ४-५ महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निराधारांची ना काम-ना पैसा अशी स्थिती झाली आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहात असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली असून, रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठिण होत आहे.
तंटामुक्त समितीचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. याअंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र गाव तंटामुक्त झाले व बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.
नाल्यांवरचे अतिक्रमण काढा
गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण होत आहे. परिणामी कचरा साचून नाल्या जाम झाल्या आहेत. सांडपाण्यामुळे त्यातून दुर्गंधी सुटत आहे. शिवाय डासांचा जोर वाढत असल्याने साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. नगर परिषदेने नाल्यांवरील हे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत वाहनांच्या रांगा
सडक अर्जुनी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या कडेला वाहनचालक त्यांची वाहने उभी करीत असल्याने येथे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहतूक शाखेने या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्हा स्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
किड्यांमुळे शहरवासी त्रस्त
गोंदिया : रात्र होताच शहरात किड्यांचा जोर वाढत आहे. हे किडे चावत असल्याने शहरवासी चांगलेच त्रासले आहेत. यातील काही किडे चावल्याने त्वचाविकारही होत असल्याचे दिसत आहे.