मार्किंगच्या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:24+5:30
बाजारपेठेतील रस्ते आधीच अरूंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यांचे वाहन रस्त्यांवर उभे करावे लागतात.यातूनच शहरात ठिकठिकाणी ट्राफीक जामची समस्या निर्माण होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोहीम राबविली जाते.

मार्किंगच्या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : व्यापारी आपले सामान रस्त्यावर मांडून करीत असलेल्या अतिक्रमणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मार्कींगचा प्रयोग अंमलात आणला. या प्रयोगाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.परिणामी, रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या तुर्तास सुटली आहे.
बाजारपेठेतील रस्ते आधीच अरूंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यांचे वाहन रस्त्यांवर उभे करावे लागतात.यातूनच शहरात ठिकठिकाणी ट्राफीक जामची समस्या निर्माण होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोहीम राबविली जाते. मात्र काही दिवसांनी स्थिती ‘जैसे थे’ होते व व्यापारी सामान रस्त्यांवर मांडून मोकळे होतात. इंदिरा गांधी स्टेडियमसमोरील फुटपाथ दुकानदारांकडून सर्वाधिक अतिक्रमण केले जात असल्याचे दिसते.
यावर तोडगा म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी मंगळवारी (दि.२६) फुटपाथ व्यापाऱ्यांना बोलावून मार्कींगचा प्रयोग अंमलात आणण्याबाबत चर्चा केली. तसेच सर्वांच्या सहमतीने लगेच फुटपाथ दुकानांसमोर ५ फूट जागा सोडून मार्कींग करण्यात आली. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडून या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात असल्याचे दिसत आहे. म्हणूनच हा रस्ता आता मोकळा झाला आहे.
पाच व्यापाऱ्यांवर केली कारवाई
व्यापाऱ्यांकडून अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला सहकार्य केले जात असतानाच एका व्यापाऱ्याने नियम तोडल्याने गुरूवारी (दि.२८) त्याला वाहतूक नियंत्रण शाखेने दंड ठोठावला. त्याचप्रकारे भाजी बाजारात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली.
विशेष पथकाचे केले गठन
वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा मोहीम राबविते. मात्र काही दिवसांनी मोहीम बंद पडते.अशात व्यापारीही पुन्हा अतिक्रमण करून मोकळे होतात व जैसे थे स्थिती निर्माण होते. मात्र आता ही मोहीम सातत्याने राबविण्यासाठी तायडे यांनी विशेष पथकाचे गठन केले आहे. यात तीन कर्मचारी असून तायडे स्वत: त्यांच्यासोबत राहून बाजारात फिरून पाहणी करतील. कुणीही अतिक्रमण करून वाहतुकीला अडचण निर्माण करतांना दिसल्यास त्याला लगेच दंड ठोठावला जाणार आहे.