पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:29 IST2021-04-24T04:29:28+5:302021-04-24T04:29:28+5:30
गोंदिया : कोरोनाशी लढा देताना फ्रंट वर्कर म्हणून पोलीस काम करतात; परंतु या पोलिसांचेच जीव सर्वाधिक धोक्यात आहेत. भररस्त्यावर ...

पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या! (डमी)
गोंदिया : कोरोनाशी लढा देताना फ्रंट वर्कर म्हणून पोलीस काम करतात; परंतु या पोलिसांचेच जीव सर्वाधिक धोक्यात आहेत. भररस्त्यावर उभे राहून किंवा गर्दीला पांगविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या पोलिसांना कोरोना होतो. कोरोनामुळे त्यांच्यावर मृत्यूदेखील ओढावतो. अशा पोलिसांनी आता कायदा व सुव्यवस्था सांभाळताना आपल्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस दलात २१०१ पोलीस कर्मचारी, तर ११ अधिकारी कार्यरत आहेत. या पोलिसांचा कोरोनासंबंधी आढावा घेतला असता आतापर्यंत ३२९ पोलिसांना कोरोनाच्या लसीचा एकही डोस मिळाला नसल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाशी लढताना फ्रंट वर्कर म्हणून पोलिसांना आधी लस देणे आवश्यक असताना गोंदिया जिल्ह्यातील ३२ पोलीस अधिकारी, तर २९७ कर्मचारी यांना अद्याप कोरोनाची लस देण्यात आली नाही. पहिला डोस घेणारे १८०४ पोलीस कर्मचारी, तर ८६ पोलीस अधिकारी आहेत. दुसरा डोस घेणारे ९१८ पोलीस कर्मचारी, तर ५१ अधिकारी आहेत. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील ३४० पोलीस कर्मचारी, तर ४५ पोलीस अधिकारी यांना कोरोना झाला आहे. यापैकी ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
..........
पहिला डोस घेणारे
कर्मचारी-१८०४
अधिकारी- ८६
दुसरा डोस घेणारे
कर्मचारी-९१८
अधिकारी- ५१
एकही डोस न घेणारे
कर्मचारी-२९७
अधिकारी- ३२
...........
एकूण कोरोनाबाधित पोलीस- ३४०
सध्या उपचार सुरू असलेले पोलीस- ७२
एकूण कोरोनाबाधित पोलीस अधिकारी - ४५
सदध्या उपचार सुरू असलेले पोलीस- ९
मृत्यू -४
.........
बाबा, आम्ही घरी वाट पाहतोय......!
आमचे बाबा ड्युटीवर गेले की, धाकधूकच होते. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने बाबांच्या आरोग्याची काळजी वाटते. या काळजीत नेहमीच त्यांची चिंता आम्हाला व आमची चिंता त्यांना राहते. बाबा घरी स्वस्थ आल्याशिवाय आमच्या जिवात जीव नसतो.
- तेजस्विनी गणवीर, गोंदिया.
........
कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचे तांडव पाहता वडिलांना नोकरीवरही जाऊ द्यायची इच्छा होत नाही; परंतु कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे त्यांचे काम असल्याने त्यांना मनाईपण करू शकत नाही. बाबा काळजी घ्या, असेच आम्ही सांगत असतो.
श्रेया गणवीर, गोंदिया.
........
कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे, त्यात आम्ही कसे सुटणार? बाबा नोकरीसाठी दररोज बोहर जातात. त्यामुळे सर्वाधिक काळजी त्यांची वाटते. फ्रंट वर्कर म्हणून काम करणाऱ्या माझ्या बाबांना नेहमी काळजी घ्या, असे आम्ही सांगत असताे. घरी कधी येतील याच्या प्रतीक्षेतच आम्ही असतो.
- हिमांशू हुमने
.....
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून रस्त्यावर उभे राहून कायदा व सुव्यवस्था उत्तमरीत्या सांभाळणाऱ्या
माझ्या बाबांची आम्हाला काळजी आहे. कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी जे-जे उपाय करता येतील ते उपाय आम्ही करत असतो.
- पायल चांदेवार.