पोलीस लाइफ; ना ड्यूटीची वेळ, ना पगाराचा मेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST2021-02-10T05:00:00+5:302021-02-10T05:00:26+5:30
२४ तास काम करणाऱ्या पोलिसांना नेहमीच तणावात राहावे लागते. एखाद्या कुजलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापासून गुन्हेगारांचा छडा लावण्यापर्यंतचे काम करूनही अनेकदा हक्काची सुटी मिळत नसल्याने पोलीस कर्मचारी आपल्याच विभागासंदर्भात अनेकदा संताप करीत असताना दिसतात; परंतु पोलीस विभागात शिस्त पाळावी लागत असल्याने मुकाट्याने अन्याय सहन करून ना आंदोलन, ना धरणे देण्याचा अधिकार पोलिसांना आहे.

पोलीस लाइफ; ना ड्यूटीची वेळ, ना पगाराचा मेळ!
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिस्त, गस्त आणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. या कामाच्या तणावाखाली असलेल्या पोलिसांना विविध आजार जडतात. आपले आजार घेऊन २४ तास नोकरी करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हक्काचीही सुटी उपभोगता येत नाही. आपल्या हक्काच्या सुटीसाठी पोलीस अधिकाऱ्यांची जी हुजूरी करावी लागते. त्याशिवाय त्यांना सुटी दिली जात नाही. गोंदिया जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून, गोंदिया जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पोलीस यंत्रणा नाही. त्यामुळे नोकरी करणाऱ्या पोलिसांवर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण आहे. २४ तास काम करणाऱ्या पोलिसांना नेहमीच तणावात राहावे लागते. एखाद्या कुजलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापासून गुन्हेगारांचा छडा लावण्यापर्यंतचे काम करूनही अनेकदा हक्काची सुटी मिळत नसल्याने पोलीस कर्मचारी आपल्याच विभागासंदर्भात अनेकदा संताप करीत असताना दिसतात; परंतु पोलीस विभागात शिस्त पाळावी लागत असल्याने मुकाट्याने अन्याय सहन करून ना आंदोलन, ना धरणे देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. चूक असो किंवा नसो ‘बॉस इज ऑलवेज राइट’ अशाच भूमिकेत पोलिसांना राहावे लागते. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांना तुटपुंजे वेतन असते तेही अनेकदा वेळेवर मिळत नाही. फेब्रुवारी महिन्याची ९ तारीख गेली तरीही पोलिसांचे वेतन झाले नाही.
२४ तासांची ड्यूटी
पोलिसांना २४ तासांची ड्यूटी करावी लागते. आठ तासांची एक पाळी केल्यानंतही गरजेनुसार त्या पोलिसांची ड्यूटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंदोबस्त कसा राहील यानुसार लावण्यात येते.
कुटुंबासाठी वेळ मिळत नाही
पोलिसांना आपल्या कुटुंबांना वेळ देण्यासाठी वेळच उरत नाही. नोकरीवरून परतल्यानंतर पत्नी किंवा मुलाबाळांना दुकानात खरेदीसाठी किंवा इतर ठिकाणी जाण्याची तयारी पोलिसांनी केली तर त्याच वेळी पोलीस ठाण्यातून कॉल आल्यास त्यांना सर्व कामे बाजूला सारून आधी पोलीस विभागाचे काम करावे लागते.
शिक्षणाची जबाबदारी पत्नीवर
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या पत्नीच्या खांद्यावर टाकावी लागते. मी ड्यूटी करतो तू मुलांना सांभाळ हेच ते आपल्या पत्नीला म्हणत असावेत. मुलांच्या शिक्षणाकडे त्यांच्या पत्नीच लक्ष घालतात.
११८ पोलिसांना घरे
गोंदिया जिल्ह्यात २ हजार १९० पोलीस कर्मचारी आहेत. यापैकी ११८ पोलिसांना घरांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. ४९० पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस वसाहतीत क्वाटर्स मिळाले आहेत. ९२ पोलीस कर्मचाऱ्यांनी होम फायनान्ससाठी अर्ज केला; परंतु त्यातील एकही अर्ज अद्याप मंजूर झाले नाही.