खून प्रकरणात पोलिसांचाच समावेश
By Admin | Updated: July 19, 2015 01:31 IST2015-07-19T01:31:58+5:302015-07-19T01:31:58+5:30
आमगाव तालुक्याच्या कातुर्ली येथील सुशील सिताराम कोरे यांचा २४ डिसेंबर २०१४ रोजी खून करण्यात आला.

खून प्रकरणात पोलिसांचाच समावेश
पत्रपरिषदेत आरोप : तपास केलाच नाही
गोंदिया : आमगाव तालुक्याच्या कातुर्ली येथील सुशील सिताराम कोरे यांचा २४ डिसेंबर २०१४ रोजी खून करण्यात आला. या प्रकरणातील संशयितांची माहिती पोलिसांना देण्यात आली. परंतु गोंदिया ग्रामीण पोलिसांनी हातमिळवणी करून आरोपींना अभय देत अपघात झाल्याचे खोटे पुरावे जमा करण्याचा आटापिटा चालवला. या प्रकरणातील आरोपींना या प्रकरणातील तपासी अंमलदार पोलीस हवालदार आडे जबाबदार असल्याचा आरोप मृत सुशिलचा भाऊ रविंद्र कोरे यांनी केला आहे.
मृतक सुशील कोरे व खूनाचा संशय असलेला उत्तम रहांगडाले या दोघांचे ६ डिसेंबर २०१४ ला भांडण झाले होते. उत्तम रहांगडाले ६ डिसेंबर रोजी कातुर्ली गावात तोंडाला काळे कापड बांधून संशयास्पद स्थितीत वावरत असतांना सुशील कोरे याने त्याला टोकले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने आपण कातुर्लीचाच आहोत असे सांगितले. त्यावर उत्तमला घर दाखव असे म्हटले आणि गावात घेऊन गेला. त्यात उत्तमला आपली मानहाणी झाली असे वाटले त्यावेळी त्याने सुशीलला ठार करण्याची धमकी दिली होती. उत्तमच्या मुलानेही त्याचा खून करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार त्यांनी सुशीलच्या खूनाचा कट रचला. या प्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार आडे यांचाही हात असल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. या प्रकरणाचे तपासी अंमलदार आडे संशय असलेल्या उत्तम रहांगडाले यांच्या घरी भाड्याने राहतात. घटनेच्या दिवशी रात्रीला सुशील कोरे व हवालदार आडे यांनी गोंदियाच्या केसर हॉटेलात जेवण केले. त्यांनीच सुशीलची क्षणाक्षणाची माहिती आरोपींपर्यंत पोहचविली असावी. दुसऱ्या दिवशी सकाळी घटना उघडकीस येता गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातून आडे येताच हा अपघात आहे असे बोलतात. त्यांची या प्रकरणात भूमीका संशयास्पद आहे. त्यांनी घरच्यांचे बयान त्यांच्या म्हणण्यानुसार घेतले नाही. या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. घटनेच्या रात्री मृतक सुशील कोरे यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींची पोलिसांनी सहा महिने लोटूनही माहिती घेतली नाही. या खूनाच्या तपासणीसाठी पाठविलेल्या चाचणींचा अहवाल मृताच्या नातेवाईकांना का देत नाही? घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर रक्ताचे डाग होते तरी देखील पोलिसांनी या रक्ताच्या डागाला कोंबडीचे रक्त असेल असे बोलून टाळले. परंतु लोकांनी आक्रोश करताच तेथील रक्ताचे नमुने पोलीसांनी उचलले. परंतु पंधरा दिवस ते नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले नाही. त्यावर रविंद्रने फोन करून चाचणीसाठी नमुने का पाठविले नाही असे म्हटले असता त्यांनी आजच नमुने पाठविल्याचे सांगितले. त्यांनी तेथून उचललेले रक्ताचे नमुने पाठविले की त्यातही पोलिसांनी बदल केला ही बाब संशयास्पद असल्याचे रविंद्र म्हणाले.
आरोपींच्या पिंजऱ्यात या प्रकरणाचा तपासी अंमलदार आडे याला घेऊन त्यांचीही विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी कोरे कुटुंबियांनी केली आहे. या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही खूनाचा गुन्हा दाखल न करता अपघात झाल्याचे खोटे पुरावे ग्रामीण पोलीस जोडत आहे. सदर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करू असा इशारा कोरे कुटुंबियांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)