बडतर्फ पोलिसानेच केला कट रचून खून

By Admin | Updated: February 28, 2017 00:59 IST2017-02-28T00:59:03+5:302017-02-28T00:59:03+5:30

डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या १८ जानेवारी रोजी पळसगाव ते जांभळी रस्त्यावर एका पुरुषाचा मृतदेह पडल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

The police formed a conspiracy to kill the murders | बडतर्फ पोलिसानेच केला कट रचून खून

बडतर्फ पोलिसानेच केला कट रचून खून

काठ्यांनी बदडले : पाच आरोपींना अटक
गोंदिया : डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या १८ जानेवारी रोजी पळसगाव ते जांभळी रस्त्यावर एका
पुरुषाचा मृतदेह पडल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदर मृत व्यक्ती कोण आहे याचा शोध घेत असताना पोलिसांना त्या व्यक्तीचा कट रचून खून झाला असून तो खून बडतर्फ पोलिसानेच केला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
मृत व्यक्तीचे नाव कामराज संपत राऊत असे असून तो भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गर्रा/बघेडा येथील असल्याचे निष्पन्न निघाले. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी संशयीत विनोद सांडेकर देव्हाडी ता.तुमसर याला ताब्यात घेतले व विचारपूस केली असता मृतक कामराज राऊत व विनोद सांडेकर हे मित्र होते. लोकांना फसवून नोकरी लावून देतो असे सांगून पैसे घेण्यामध्ये ते तरबेज होते अशी माहिती मिळाली.
कामराज राऊत याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते व आरोपी विनोद सांडेकर यास त्यापैकी काही पैसे नोकरी लावून दे असे म्हणून दिले होते. परंतू नोकरी लागत नसल्याने अनेकदा कामराज राऊत हा विनोद सांडेकर याच्याकडे दिलेले पैसे मागण्यासाठी तगादा लावत होता. परंतू मटका व जुगार खेळण्याचा शौकीन असलेल्या विनोद सांडेकर याचेकडून हे पैसे खर्च झाले होते. त्यामुळे कामराज यालाच संपविण्याचा कट विनोद सांडेकर याने रचला व त्यासाठी विलास बावणे, अनिल उईके, मनोहर रु खमोडे, गणेश देवगडे यांना एक लाख रु पयांची सुपारी दिली. त्यानुसार १७ जानेवारी रोजी तुला पैसे देतो असे सांगून कामराज याला विनोद सांडेकर व गणेश देवगडे यांनी मोटारसायकलवर तुमसरवरून सडक/अर्जुनी तालुक्यातील मालीजुंगाच्या घनदाट जंगलामध्ये आणले. तिथे सर्वांनी मिळून काठ्यांनी मारून कामराजचा निर्घृन खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह मोटरसायकलवर ठेवून मालीजुंगा-पांढरी-पळसगाव या मार्गे जांभळी/दोडकीकडे जाणाऱ्या रोडवर नाल्यामध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनामध्ये डुग्गीपारचे ठाणेदार केशव वाभळे, पोलीस शिपाई शाम कोरे, अशोक जायभाये, सुखदास मेश्राम, इंद्रजीत भूते, सुरेंद्र चंद्रिकापुरे, संदीप शिवणकर, राहूल वाठोरे, विलास टेंभूर्णे व सायबर सेलचे पोलीस शिपाई दमाये यांनी केला.

सूत्रधार सांडेकर २०१३ मध्ये बडतर्फ
या प्रकरणातील मूख्य सूत्रधार विनोद सांडेकर हा गोंदिया पोलीस दलामध्ये १९८८ साली पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. परंतू त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे त्याला २०१३ मध्ये पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस कोणत्या प्रकारे कोणत्याही गुन्ह्याचा तपास करतात याची त्याला पूर्वकल्पना होती. त्यामुळे त्याने खून करतेवेळी व गुन्ह्याचा पुरावा नष्ट करतेवेळी योग्य ती खबरदारी घेतली होती. परंतू डुग्गीपार पोलीसांनी गुन्ह्याचा कसोशीने तपास करु न सर्व ५ आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर कोणताही पुरावा नसताना शिताफीने माग काढत त्यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: The police formed a conspiracy to kill the murders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.