खरिपातील ४० हजार हेक्टरसाठी नियोजन

By Admin | Updated: September 9, 2016 01:57 IST2016-09-09T01:57:56+5:302016-09-09T01:57:56+5:30

मागील वर्षाच्या तुलनेत कमी पडलेल्या पावसामुळे यंदाची शेती वांद्यात आली असून पीकांना पाण्याची गरज आहे.

Planning for 40 thousand hectare of Kharif | खरिपातील ४० हजार हेक्टरसाठी नियोजन

खरिपातील ४० हजार हेक्टरसाठी नियोजन

पिकांना वाचविण्यासाठी पाणीपूर्ती : पाटबंधारे विभाग धावला मदतीला
कपिल केकत  गोंदिया
मागील वर्षाच्या तुलनेत कमी पडलेल्या पावसामुळे यंदाची शेती वांद्यात आली असून पीकांना पाण्याची गरज आहे. मात्र पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांच्या डोळ््यात अश्रू आले आहेत. अशात त्यांच्या मदतीसाठी पाटबंधारे विभाग धावून आला असून खरिपातील ४० हजार हेक्टरसाठी विभागाकडून पाणीपूर्ती केली जात आहे. अशात आजघडीला शेतकऱ्यांचा देव नसून पाटबंधारे विभागच वाली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तवीक जिल्ह्यातील प्रमुख पीकही धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे.
परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.
शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंग करीत आहे. परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकऱ्यांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे.
यंदाही मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला व पाण्याअभावी शेतात उभी पिके पोखरत चालली आहे. पाण्याची आता खरी गरज असताना पावसाने डोळे वटारले असून पिके पाण्यासाठी तहानलेली आहेत. अशात सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचे ठिक आहे, मात्र ज्यांच्याकडे पाण्याचे साधन नाही त्यांचा देव नव्हे तर सध्या पाटबंधारे विभागच वाली आहे.
आज पाणी नसल्याने पिकांना वाचविण्याची गरज असताना हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला देव नसून पाटबंधारे विभाग धावून आला आहे.
कारण पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील ४० हजार ५२५ हेक्टर सिंचनाचे नियोजन केले असून त्यानुसार शेतीला पाणीपूर्ती केली जात आहे. यात बाघ प्रकल्प व इटियाडोहचे पाणी शेतीसाठी वरदान ठरत आहे.

बाघ प्रकल्पाचे सर्वाधिक क्षेत्र
यंदा बाघ प्रकल्पातून २२ हजार ८०० हेक्टर तर इटियाडोह प्रकल्पातून १७ हजार ७२५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. बाघ प्रकल्पांतर्गत कालीसराड व सिरपूर या साठवण प्रकल्पाचे पाणी पूजारीटोलाला सोडले जात असून पुढे पूजारीटोला प्रकल्पाच्या कालव्यातून शेतीचे सिंचन केले जाते. त्याचप्रकारे इटियाडोह प्रकल्पातील कालव्यांतून पाणीपूर्ती करून परिसरातील शेतीची तहान भागविली जात आहे.
भंडारा व गडचिरोलीसह मध्य प्रदेशातही सिंचन
बाघ व इटियाडोह प्रकल्पातून जिल्ह्यातील शेतीचे सिंचन केले जात असतानाच लगतच्या भंडारा, गडचिरोली तसेच मध्यप्रदेश राज्यातील शेतीचेही सिंचन केले जात आहे. त्याचे असे की, बाघ प्रकल्पातील पूजारीटोला प्रकल्पाच्या कालव्यातून जिल्ह्यातील शेतीसह मध्यप्रदेश राज्यातील शेतीलाही पाणी दिले जात आहे. तसेच इटियाडोह प्रकल्पातून गोंदिया जिल्ह्यासाठी सहा हजार १२५ हेक्टर, गडचिरोली जिल्ह्यातील सात हजार हेक्टर व भंडारा जिल्ह्यातील चार हजार ६०० हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पांटबंधारे विभागाचा तसा करार करण्यात आला असून त्यानुसार हे पाणी सोडले जाते.

Web Title: Planning for 40 thousand hectare of Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.