पाथरीला देशातील आदर्श गाव बनविणार

By Admin | Updated: December 29, 2014 01:34 IST2014-12-29T01:34:32+5:302014-12-29T01:34:32+5:30

खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेल्या पाथरी या गावात केवळ मूलभूत सुविधा देऊन थांबणार नाही, तर या गावाला राज्यातच काय पण देशातील आदर्श गाव बनवू, ...

Pathri to make ideal village in the country | पाथरीला देशातील आदर्श गाव बनविणार

पाथरीला देशातील आदर्श गाव बनविणार

गोंदिया : खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेल्या पाथरी या गावात केवळ मूलभूत सुविधा देऊन थांबणार नाही, तर या गावाला राज्यातच काय पण देशातील आदर्श गाव बनवू, मात्र त्यासाठी लोकांनीही तेवढेच सहकार्य करून योग्य ते बदल घडविण्यास तयार असले पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.
पाथरी येथे रविवारी (दि.२८) आयोजित गावभेट कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायतच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी.शिंदे, माजी आ.मधुकर कुकडे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, सरपंच आशा खांडवाये यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारीगण उपस्थित होते.
याप्रसंगी खा.पटेल म्हणाले, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून आम्ही पाथरी या गावाची आदर्श गाव योजनेसाठी निवड करताना अनेक निकष तपासले. या गावात विविध जातीधर्माचे लोक राहतात. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद-जाम्यातिम्याची कर्मभूमीही याच गावाजवळ आहे. हे गाव माझ्यासाठी नवीन नाही. येथील गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा रास्तच आहेत. पण गावकरी केवळ मुलभूत गरजांचाच विचार करतात. वास्तविक मला या गावासाठी त्यापलीकडे जाऊन भरपूर काही करायचे आहे. त्यासाठी गावाच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. एकदा हा मास्टर प्लॅन तयार झाला की त्यानुसार एकेक गोष्टीची अंमलबजावणी केली जाईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ येथील गावकऱ्यांना मिळण्यावर भर दिला जाईल. गावाच्या संपूर्ण विकासाला वेळ लागेल, पण जी कामे होतील ती चांगल्या दर्जाची होतील अशी ग्वाही खा.पटेल यांनी दिले. कामांचा दर्जा चांगला राहील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासाठी आ.राजेंद्र जैन यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी गावाला भेटी देऊन कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. पाथरीतील गावकऱ्यांना दुबार पिक घेता यावे यासाठी सिंचनाची सोय वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यातून गावकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण केले जाईल. बचत गटांना सक्षम करण्यासोबतच गावाच्या परिसरात उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारे लघुउद्योगांना चालना देऊन रोजगार-स्वयंरोजगारावर वाढविण्यावरही भर देणार असल्याचे यावेळी खा.पटेल म्हणाले. गावात मुलांना किंवा वृद्धांना फिरण्यासाठी छोटेखानी बगिचा, आरोग्याच्या सोयीचाही यात समावेश असणार आहे.
या सर्व कामांसाठी विशेष असा निधी नाही. त्यामुळे या कामांसाठी निधी कमी पडल्यास बाहेरून निधी मिळवून कामे केली जातील, असा विश्वास खा.पटेल यांनी गावकऱ्यांना दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी म्हणाले, गावकऱ्यांनी १७ डिसेंबरला ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांना अपेक्षित असलेल्या कामांची यादी दिली आहे. जसा निधी येईल त्याप्रमाणे सर्व कामे केली जातील असे सांगितले.
सुरूवातीला पं.स.सदस्य केवल बघेले यांनी प्रास्ताविकात गावकऱ्यांच्या अपेक्षा मांडून पाथरी गावाची निवड केल्याबद्दल खा.पटेल यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर, जि.प. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाकोडीकर, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश लोखंडे, राकाँचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, देवेंद्रनाथ चौबे, विजय राणे, गोरेगावच्या तहसीलदार शिल्पा सोनाळे, सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी युवराज कुंभलकर, गंगाधर परशुरामकर आदींसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
याप्रसंगी खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर खा.पटेल, आ.जैन यांनी गावातील शाळेच्या परिसरात पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक पी.ए.रहांगडाले यांनी तर आभार प्रदर्शन मुलचंद खांडवाये यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्त अनुदान तीन महिन्यांत देणार
प्रास्ताविकात केवल बघेले यांनी गावकऱ्यांच्या समस्या मांडताना कटंगी प्रकल्पात शेतजमीन गेलेल्या लोकांना अद्याप प्रकल्पग्रस्त अनुदान आणि दाखल मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली. याबाबत खा.पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लगेच हा विषय निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी आपल्या भाषणात याबाबत बोलताना कटंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अनुदान ३ महिन्यात त्यांना दिले जाईल. याशिवाय प्रकल्पग्रस्तांचे दाखलेही लवकरात लवकर दिले जातील, असे सांगितले.

Web Title: Pathri to make ideal village in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.