प्रवाशी निवारे वाऱ्यावर
By Admin | Updated: July 19, 2014 23:59 IST2014-07-19T23:59:23+5:302014-07-19T23:59:23+5:30
गोंदिया या दोन आगारांसह भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारातील बहुतांश बसफेऱ्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. या तीनही आगारातून एसटीला वर्षाकाठी ७० कोटी रुपये प्रवासी भाड्यापोटी उत्पन्न होते.

प्रवाशी निवारे वाऱ्यावर
तिरोडा, गोंदिया या दोन आगारांसह भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारातील बहुतांश बसफेऱ्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. या तीनही आगारातून एसटीला वर्षाकाठी ७० कोटी रुपये प्रवासी भाड्यापोटी उत्पन्न होते. मात्र एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी बनविलेल्या निवाऱ्यांबाबत मात्र एसटी महामंडळ उदासीन दिसत आहे.
जिल्ह्यातील बस प्रवाशांसाठी फक्त चारच बसस्थानकं आहेत. पाचव्या बसस्थानकाची उभारणी सुरू आहे. सध्याच्या चारपैकी आमगाव येथील बसस्थानक चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे प्रवाशांविना ओसाड पडले आहे. गोंदिया आगारात आमगाव व गोंदिया अशी दोन बसस्थानके आहेत. या आगारांतर्गत ५४ प्रवासी निवारे आहेत. दररोज ३५० फेऱ्या चालविल्या जातात. दररोज या आगारातील ३५ हजार प्रवासी प्रवास करतात.
तिरोडा आगारात फक्त एकच बसस्थानक तिरोडा येथे आहे. या आगारांतर्गत ४५ निवारे आहेत. या आगारात १६० फेऱ्या चालविल्या जातात. साकोली आगारात साकोली, लाखांदूर, लाखनी, देवरी व अर्जुनी/मोरगाव अशी पाच बस स्थानके आहेत. यापैकी अर्जुनी/मोरगाव येथील बसस्थानकाचे काम सुरू आहे. या आगारांतर्गत २४ प्रवाशी निवारे असून ३२४ बसफेऱ्या आहेत. पण ७० कोटींचे उत्पन्न देणाऱ्या या प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत एसटी महामंडळासह सर्वच जण उदासीन आहेत.
बसस्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची, मुत्रीघर किंवा शौचालयाची व्यवस्था आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातील १११ प्रवाशी निवाऱ्यांवर कोणत्याच सोयी नाहीत. किमान महिला व पुरुषांसाठी शौचालय किंवा मुत्रीघराची व्यवस्था असणे गरजेचे आहे. प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम आमदार, खासदार निधीतून होत असल्यामुळे येथे सोई-सुविधा करणे आमचे काम नसल्याचे परिवहन महामंडळाचे अधिकारी सांगतात. कोट्यवधीचे प्रवाशी भाडे देणाऱ्यांना तुटक्याफुटक्या निवाऱ्यातच प्रवाशांना आश्रय घ्यावा लागतो. गोंदिया शहराच्या जयस्तंभ चौकातील प्रवासी निवाऱ्यात तर बसायला धड चांगली जागाही नाही. जिकडेतिकडे पसरलेल्या कचऱ्यासोबत मोकाट गुरे तिथे ठाण मांडून बसलेले असतात.