‘पार्टी’ प्रकरण येणार अंगलट
By Admin | Updated: February 5, 2015 23:10 IST2015-02-05T23:10:52+5:302015-02-05T23:10:52+5:30
नगर परिषदेद्वारा संचालित माताटोली हायस्कूलमध्ये मटन पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. मात्र चौघांनी आपल्या मर्जीने

‘पार्टी’ प्रकरण येणार अंगलट
गोंदिया : नगर परिषदेद्वारा संचालित माताटोली हायस्कूलमध्ये मटन पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. मात्र चौघांनी आपल्या मर्जीने शाळेत पार्टीचे आयोजन केले नसल्याचेही स्पष्ट होत आहे. यामुळेच या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून या मटन पार्टीची चौकशी केली जाणार आहे. यासाठी चौकशी समितीही गठित करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण संबंधितांच्या अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.
गणतंत्र दिनी सर्वत्र जल्लोष केला जात असताना माताटोली शाळेतील कर्मचारी मात्र तेवढ्याच उत्साहात शाळेतील भांडारकक्षात मटन पार्टी साजरी करीत होते. शाळेतील एका व्यक्तीच्या जन्मदिनानिमित्त ही पार्टी सुरू असल्याची माहिती समोर आली. या मटन पार्टीची गोष्ट बाहेर आल्याने त्यांच्या पार्टीवर विरजण पडले होते.
यावेळी काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचल्याची माहिती मिळताच पार्टीत उपस्थित काही शिक्षक तेथून पसार झाले तर शाळेचे परिचर मोहम्मद इरशाद शेख, रविकांत शर्मा, विनोद टेंभूर्णे व अनिल तिडके हे चौघे रंगेहात सापडले.
मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या आदेशावरून प्रशासकीय अधिकारी सी.ए.राणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. अखेर २८ जानेवारी रोजी चौघांना निलंबीत करण्यात आले. मात्र येथे हा प्रकार संपत नाही.
निलंबीत करण्यात आलेले चौघे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून ते आपल्या मर्जीने शाळेत मटन पार्टी करण्यासाठी धजावतील काय, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. गणतंत्र दिनी (दि.२६) झालेल्या या मटन पार्टीच्या दिवशीच शाळेतीलच एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता व त्यानेच ही पार्टी आयोजीत करण्याची जबाबदारी या चौघांवर टाकल्याची कूजबूज कानी पडत आहे. घटनास्थळी चौघेच हाती आल्याने ते कारवाईस पात्र ठरले. मात्र या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशी केली जाणार आहे. दरम्यान त्या निलंबित कर्मचाऱ्यांकडून न.प. प्रशासनाला कोणती माहिती मिळाली याची माहिती मिळू शकली नाही. (शहर प्रतिनिधी)