स्वच्छतेच्या जागृतीसाठी वाढविणार युवकांचा सहभाग

By Admin | Updated: December 20, 2014 22:42 IST2014-12-20T22:42:50+5:302014-12-20T22:42:50+5:30

सळसळणाऱ्या तरूणाईने स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास जिल्हा पूर्णपणे ‘निर्मल’ करणे कठीण नाही. स्वच्छतेसाठी त्यांचा सहभाग वाढावा म्हणून स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा जिल्हाभर

Participation of youth to increase cleanliness | स्वच्छतेच्या जागृतीसाठी वाढविणार युवकांचा सहभाग

स्वच्छतेच्या जागृतीसाठी वाढविणार युवकांचा सहभाग

गोंंदिया : सळसळणाऱ्या तरूणाईने स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास जिल्हा पूर्णपणे ‘निर्मल’ करणे कठीण नाही. स्वच्छतेसाठी त्यांचा सहभाग वाढावा म्हणून स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा जिल्हाभर घेतली जाणार आहे. या स्पर्धेतून पारितोषिकांसह युवकांच्या कलागुणांनाही वाव मिळणार आहे. त्यामुळे युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एल. राठोड यांनी केले आहे.
येत्या २५ डिसेंबरपर्यंत तालुकास्तरावर आणि त्यानंतर ३० डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा होणार आहे. स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय या दोन गटात होणार आहे. तालुकास्तरावर कनिष्ठ महाविद्यालयीन युवकांसाठी विचार निर्मल महाराष्ट्राचा, प्रवास आव्हानांचा, जोश तरूणाईचा, जागर स्वच्छतेचा, शुध्द पाणी पिण्याचे, आरोग्य सांभाळी गावाचे, माझ्या स्वप्नातील स्वच्छ निर्मल गाव, आपलं पाणी आपली योजना हे विषय आहेत. तर तालुकास्तरीय वरिष्ठ महाविद्यालय गटासाठी राखू पाण्याची गुणवत्ता, मिळेल आरोग्याची सुबत्ता, लोकसहभाग गावाचा आधार पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा तरुणाईच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती, मी निर्मल गावाचा सरपंच बोलतोय, स्वच्छतेतून समृध्दीकडे, हे विषय आहेत.
जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालय गटासाठी स्वच्छ निर्मल शाळा, बालकास लावी लळा, शुध्द थेंब पाण्याचा लाभ आरोग्यदायी जीवनाचा, कचरा नव्हे कांचन घनकचऱ्याचे व्यवस्थापन, मिळून साऱ्या जणी मिळवू स्वच्छ व शुध्द पाणी, साठवू थेंब थेनब पाण्याचा विचार रुजवू पावूस संकलनाचा, जिल्हास्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी तरूणाईचे नवे धडे स्वच्छतेतून समृध्दीकडे, करू सांडपाण्याचे व्यवस्थापन, धरतीचे होईल नंदनवन, करू तपासणी पाण्याची हमी आरोग्यदायी जीवनाची, माझ्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर, निर्मल व समृध्द महाराष्ट्र, बहू असोत सुंदर, स्वच्छ महादेश हा, हे विषय राहणार आहेत.
विशेष म्हणजे राज्यस्तरापर्यंत युवकांना जाण्याची संधी येथे आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटांसाठी हागणदारीमुक्ती गावाला भूषण आपल्या देशाला, करु व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याचे मूळ सुत्र लोकसहभागाचे, वेध पाणी गुणवत्तेचा विचार निरोगी जीवनाचा, निर्मल गाव-निर्मल देश, निर्मल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा आणि राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी तरूणाई शपथ स्वच्छ भारत, सुंदर भारत, विचार निर्मल महाराष्ट्राचा प्रवास आव्हानांचा, बलशाली स्वच्छ भारत होवो, जागर स्वच्छतेचा, संकल्प निर्मल देशाचा, माझ्या स्वप्नातील सुजल-निर्मल-समृध्द भारत, हे विषय राहणार आहेत.
तालुकास्तरीय प्रथम आलेल्या स्पर्धकास पाच हजार रोख, व्दितीय आलेल्या स्पर्धकास तीन जहार रोख, तृतीय आलेल्या स्पर्धकास दोन हजार रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार ११ हजार, व्दितीय सात हजार तर तृतीय पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर राज्यस्तरावरील प्रथम विजेत्यास ५१ हजार रुपये व्दितीय ३१ हजार आणि तृतीय २१ हजार रुपयांचे पारितोषीक, करंडक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील प्रथम आलेल्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गोंदिया, सबंधित पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी व गटसंसाधन केंद्र येथे संपर्क साधावा, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) व्ही.एल.राठोड यांनी कळविले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Participation of youth to increase cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.