समर कॅम्पच्या नावावर पालकांची होत आहे लूट
By Admin | Updated: May 11, 2014 00:26 IST2014-05-11T00:26:41+5:302014-05-11T00:26:41+5:30
वार्षिक परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांना काही प्रमाणात उसंत मिळते. या नामी संधीचा लाभ उचलण्यासाठी संस्थांचे पेव फुटले आहे.

समर कॅम्पच्या नावावर पालकांची होत आहे लूट
गोंदिया : वार्षिक परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांना काही प्रमाणात उसंत मिळते. या नामी संधीचा लाभ उचलण्यासाठी संस्थांचे पेव फुटले आहे. या संस्था विविध उन्हाळी शिबिरे भरविण्याच्या नावावर संस्थांचे प्रतिनिधी पालकांना विविध आमिष दाखवून हजारोची माया गोळा करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे अनेक अनधिकृत संस्थांचा उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात पुढाकार आहे. मात्र शासनस्तरावरून या संस्थांच्या विरोधात कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या या मुलांच्या हक्काच्या सुट्ट्या असतात. स्पर्धेच्या युगात याच सुट्ट्यांच्या बहाण्याने अनेक संस्था मैदानात उतरल्या आहेत. विविध संस्थामार्फत उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यात मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, या अनुषंगाने मुलांना विविध कला शिकविल्या जातात. यात प्रामुख्याने संगीत, चित्रकला, इंग्रजी संभाषण, कराटे, जलतरण, घोडेस्वारी, नृत्य इत्यादी अनेक कलांचा समावेश आहे. या उन्हाळी शिबिरांचा कालावधी १५-२० दिवसांचा असतो. या १५-२० दिवसांच्या कालावधीत मुलांना सदर उल्लेख केलेल्या सर्व कलात पारंगत करू, असे आमिष दाखवून या संस्थांचे प्रतिनिधी पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करतात. उन्हाळी शिबिराचे शुल्क जवळपास चार ते पाच हजार रुपये असते. परंतु कलामध्ये पारंगत व्हायला एक-एक वर्ष लागते. त्याच कलेमध्ये मुलांना १५-२० दिवसांत पारंगत करण्याचे सांगितले जाते. त्यामुळे अल्पावधीत मुलांंना विविध कला शिकवून ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ यासारखी गत होत आहे. मुलांंना इंग्रजीची जोडाक्षरे शिकायला एक शैक्षणिक सत्र लागते. परंतु सदर शिबिरामध्ये १५ दिवसांत इंग्रजी संभाषण कशाप्रकारे शिकविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक उन्हाळी शिबिराचे आयोजन करणार्या अनेक संस्था अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. काही संस्थांची नोंदणीही झाली नाही. तसेच उन्हाळी शिबिरात मुलांना काही कमी जास्त झाले तर त्याची जबाबदारी उचलण्यास सदर संस्था कचरत आहेत. अशा संस्थांमध्ये मुलांना दाखल करणे घातक आहे. या शिबिरांमध्ये मुलांचे धड शिकणेही होत नाही. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन केवळ नोंदणीकृत संस्थामार्फत आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरांमध्येच मुलांना दाखल करावे आणि प्रशासनाने उन्हाळी शिबिर आयोजित करणार्या अनधिकृत संस्थावर कारवाई करावी, अशी मागणी जनसामान्यातून होत आहे. (प्रतिनिधी)