फोडाफोडीच्या भीतीमुळे पॅनल झाल्या अंडरग्राउंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST2021-01-24T04:13:03+5:302021-01-24T04:13:03+5:30
गोंदिया : जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सर्वच राजकीय पक्षांकडून वर्चस्वाचे दावे केले जात आहेत. मात्र, ग्रामपंचायतवर ...

फोडाफोडीच्या भीतीमुळे पॅनल झाल्या अंडरग्राउंड
गोंदिया : जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सर्वच राजकीय पक्षांकडून वर्चस्वाचे दावे केले जात आहेत. मात्र, ग्रामपंचायतवर सरपंच बसविणार, तोच खरा हिरो ठरणार असल्याने, आता राजकीय पक्षांकडून आपला सरपंच बसविण्यासाठी साम-दाम-दंड व भेद या शस्त्रांचा वापर केला जाणार यात शंका नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत, ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या पॅनल आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना घेऊन अंडरग्राउंड झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, ८ ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाल्याने १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. या ग्रामपंचायतींचा निकाल १८ जानेवारी रोजी लागला असून, निकाल हाती आल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून आपलेच वर्चस्व असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, ग्रामपंचायतवर सरपंच ज्यांचा बसेल, तेच खरे सत्ताधारी ठरणार आहेत. अशात मात्र यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीच्या नंतर केले जाणार असून, त्यानुसार येत्या २८ तारखेला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतर, ग्रामपंचायतींना सरपंचपदाच्या निवडणुका घेण्यासाठी तारखा देण्यात येतील व तेव्हाच सरपंचांची निवड सदस्यांतून केली जाणार आहे.
म्हणजेच, ज्यांचे सदस्य जास्त, त्यांचा सरपंच निवडून येणार व त्या पॅनल म्हणजेच पक्षाची ग्रामपंचायतवर सत्ता येणार, असे समीकरण आहे. यासाठी तेवढे सदस्य आपल्या पॅनलमध्ये असणे गरजेचे असून, येथूनच सदस्यांना आपल्याकडे घेण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, राजकारणाची पहिली पायरीच ग्रामपंचायत असल्याने जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आता राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी सदस्यांची फोडाफोडी करणार यात शंका नाही. असे झाल्यास आतापर्यंत केलेली सर्व मेहनत वाया जाणार व हीच बाब हेरून काही पॅनल आपल्या नवनिर्वाचित सदस्यांना घेऊन अंडरग्राउंड झाल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------
निवडणुकीच्या दिवशीच होणार आगमन
येत्या २८ तारखेला सरपंचांचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतरच सरपंचपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यासाठी निवडणूक विभागाकडून निश्चित कालावधी ठरवून दिला जाणार व त्यातच या निवडणुका घेतल्या जातील. म्हणजेच आता अंडरग्राउंड झालेले म्हणजेच पर्यटनासाठी गेलेले हे सदस्य निवडणुकीच्या दिवशीच थेट निवडणूक स्थळी प्रकटतील.