लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बाजारपेठेत सध्या धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण, त्या तुलनेत मागणी कमी असल्याने व तांदळाचे दर सुध्दा कमी असल्याने धानाचे दर कमी आहेत. पुढील दोन महिने धानाच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी शेतकऱ्यांना हमीभावाने धानाची विक्री करुन समाधान मानावे लागत आहे.
बाजारपेठेत सध्या खरीप हंगामातील धानाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. तर, पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात धान हा आंध्रप्रदेशात पाठविला जातो. पण, यंदा आंध्रप्रदेशातून सुध्दा धानाला मागणी आहे. तर, बाजारपेठेत ठोकळ तांदळाचे दर प्रति क्विंटल ३,२०० रुपये आहे.
सध्या तांदळाची निर्यात सुध्दा बंद आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात भारतासह थायलंड, पाकिस्तान व इतर देशातील धानाचे पीक निघते. त्यामुळे या कालावधीत बाजारपेठेत तांदळाची आवक वाढत असते.
यंदा धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. बाजारपेठेत तांदळाची आवक भरपूर आहे. त्या तुलनेत मागणी नसल्याने ठोकळ तांदळाचे भाव हे ३,२०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. त्यामुळे तांदूळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुध्दा खरेदी बंद ठेवली आहे.
पुढील दोन महिने बाजारपेठेची हीच स्थिती राहण्याची शक्यता असून, धानाचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच खुल्या बाजारपेठेत सुध्दा धानाला जास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी २,३०० रुपये हमीभावाने धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करीत आहे.
"सध्या तांदळाची निर्यात बंद आहे. याच कालावधीत इतर देशांचा तांदूळ बाजारपेठेत आला आहे. त्यामुळे तांदळाचे दर स्थिर आहेत. पुढील दोन महिने या दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. पण, त्यानंतर तांदळाचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही." - अशोक अग्रवाल, अध्यक्ष विदर्भ राईस मिल असोसिएशन.