परदेशी पाहुण्यांनी बहरली जलाशये
By Admin | Updated: January 3, 2017 00:25 IST2017-01-03T00:25:51+5:302017-01-03T00:25:51+5:30
पोषक वातावरणाचा शोध घेत आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे पक्षी सातासमुद्रापार गोंदिया जिल्ह्यातील

परदेशी पाहुण्यांनी बहरली जलाशये
अभ्यासक व पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी : पोषक वातावरणामुळे सातासमुद्रापलीकडून जिल्ह्यात दाखल
संतोष बुकावन ल्ल अर्जुनी मोरगाव
पोषक वातावरणाचा शोध घेत आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे पक्षी सातासमुद्रापार गोंदिया जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. यापूर्वी कधीही न बघितलेले विविध प्रजातीचे पक्षी अभ्यासक व पक्षी निरिक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नवेगावबांध जलाशयाकडे दिवसेंदिवस परदेशी पक्षी पाठ फिरवित असले तरी इतर जलाशयांवर त्यांचा मुक्तविहार दिसून येतो.
अर्जुनी मोरगाव तालुका निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. तलावांची संख्या भरपूर आहे. नवेगावबांध, इटियाडोह, सिरेगावबांध, बोंडगाव/सुरबन (शृंगारबांध) हे मोठे तलाव आहेत. येथे दरवर्षी हिवाळ्यात नित्यनेमाने विदेशी परक्षी येतात. यासोबतच भुरसीटोला, माहुरकुडा व इतर गावच्या तलावांवर यावेळी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे.
विदेशी पक्ष्यांचे आगमन साधारणत: आॅक्टोबर महिन्यात होत असते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी, खाद्यान्नाची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशितोष्ण प्रदेशात येऊन राहतात. प्रतिकुल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हे सुद्धा स्थलांतराचे कारण मानले जाते. स्थलांतरीत पक्षी युरोप, सायबेरीया, मंगोलीया तसेच हिमालयाकडून भारतात प्रवेश करतात. सहा महिन्याच्या वास्तव्यानंतर साधारणत: फेब्रुवारी-मार्च महिन्यात ते परततात.
मासेमारी व मानवी अधिवास नसलेल्या तलावांना विदेशी पक्षी पसंती दर्शवितात. अशा ठिकाणी थवेच्या थवे दिसून येत आहेत. सायबेरियन पक्ष्यांची संख्या भरपूर असल्याचे पक्षीनिरीक्षक सांगतात. भुरसीटोला येथील तलावांवर ग्रेलॅग गुज हे पक्षी मोठया संख्येत आ हेत. येथील तलावांवर लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चिन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पायपर (छोटी तुतवार), युरेशियन कर्लू, लिटील स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्राईप, ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) अशा विविध प्रजातींचे पक्षी स्थानिक तलावांवर दिसून येत आहेत.
काही तलावात पक्ष्यांची शिकारही होत असल्याची चर्चा आहे. शिवाय येथील तलावाच्या पाळीवर तुरपीक लागवड केली असल्याने त्याचा अभ्यासक व पक्षीप्रेमींना पक्षीवैभव न्याहाळतांना त्रास जाणवतम असल्याची ओरड आहे.
या गोष्टी ठरताहेत पक्ष्यांसाठी धोकादायक
नवेगावबांध, सिरेगावबांध येथील तलावांवर मासेमारी केली जाते. नवेगावबांध तलावात भिसकांदा मोठ्या प्रमाणात आहे. भिसकांदा हा पक्ष्यांचे आवडता खाद्य आहे. या खाद्याच्या आकर्षणापोटी पक्षी जलाशयावार मोठी गर्दी करायचे.
याशिवाय कोळी बांधव मासेमारी करतात. याचा पक्ष्यांना त्रास होतो. मानवी अधिवासामुळे त्यांची घरटी, अंडी, नष्ट होऊन प्रजननात बाधा उत्पन्न होते. त्यामुळे अशा तलावांकडे परदेशी पाहुणे पाठ दाखवित असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात.
मात्र विस्तीर्ण असलेल्या या तलावांच्या काठावर गावकरी भिसकांद्याचे उत्खनन करतात. या भिसकांद्याला प्रचंड मागणी आहे. छत्तीसगड राज्याच्या बाजारपेठेत हा भिसकांदा विकला जातो. याची भाजी तयार करुन भोजनात वापरला जाते. या अवैध उत्खननामुळे भिसकांदा नष्ट होत आहे.