गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:03+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर सर्वांनी नियमित मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गोंदिया तालुक्यातील बाधितांच्या संख्येत भर पडत असल्याने या तालुक्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. त्यामुळे गोंदिया तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी जिल्ह्यात १० कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे, तर मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढविली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सुध्दा सतर्क बनली आहे.
कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ६) एकूण ६९६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ६०१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ९५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली.
यात १० नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १.४४ टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४७४२५२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात २४९५३६ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२०४७१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१८१३ नमुने कोरोनाबाधित आढळले, तर यापैकी ४०५३१ बाधितांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर एका बाधिताने गुरुवारी कोरोनावर मात केली.
नागरिकांनो नियमांचे करा पालन...
- जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर सर्वांनी नियमित मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
प्रतिबंधात्मक लस घ्या
- कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हेच महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घ्यावे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचेसुद्धा लसीकरण सुरू असून सर्वांनी आपल्या पाल्यांना आर्वजून लस द्यावी.