कर वसुलीला व्यापाऱ्यांचा विरोध
By Admin | Updated: January 24, 2015 01:18 IST2015-01-24T01:18:22+5:302015-01-24T01:18:22+5:30
दिवसेंदिवस कर वसुलीचा आकडा वाढत जात असतानाच या कर वसुलीचा मोहिमेचा व्यापाऱ्यांकडून विरोध वाढत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे.

कर वसुलीला व्यापाऱ्यांचा विरोध
गोंदिया : दिवसेंदिवस कर वसुलीचा आकडा वाढत जात असतानाच या कर वसुलीचा मोहिमेचा व्यापाऱ्यांकडून विरोध वाढत असल्याचे चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे. यामुळेच शुक्रवारी (दि.२३) शहरातील काही व्यापाऱ्यांनी कर वसुली पथकासोबत हमरीतुमरी केल्याचा प्रकार घडला. तर एका प्रकरणात खुद्द नगराध्यक्षांनी संबंधीत व्यापाऱ्याची गॅरंटी घेतल्याचीही माहिती आहे.
मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेची कर वसुली मोहिम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत पथकाने शुक्रवारी (दि.२३) शहरातील काही मोठ्या थकबाकीदारांकडे धडक दिली. यातील एका दुचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गेले असता संबंधीत व्यापाऱ्याने मुख्याधिकारी मोरे यांच्यासोबत कर वसुलीवरून बाचाबाची केली. ही बाचाबाची एवढी वाढली की त्या व्यापाऱ्याने पथकावर चक्क खुर्ची उचलली. बाचाबाचीचा हा प्रकार रिंग रोडवरील संत तुकाराम शाळेतही घडला. तर तेथून आल्यावर श्री टॉकीज रोडवरील बग्गा इलेक्ट्रॉनिक्समध्येही संचालकांनी मुख्याधिकारी मोरे यांच्यासोबत चांगलाच वाद घातला. यातून नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला शहरातील थकबाकीदारांचा चांगलाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही पथकाने शुक्रवारी (दि.२३) तीन लाख ४५ हजार रूपयांची रोख, २६ हजार रूपयांचे धनादेश मिळवले. शिवाय पाच लाख १० हजार रूपयांचे पोस्ट डेटेड चेक सुद्धा पालिकेने मिळविले आहेत. (शहर प्रतिनिधी)
पोलिसांशिवाय सुरू आहे कर वसुली
कर वसुलीची ही मोहीम पोलिसांशिवायच सुरू आहे. परिणामी थकबाकीदार पथकावर आपला रोष काढत आहे. विशेष म्हणजे व्हीडीओ शुटींग होत असल्याने फक्त बाचाबाचीवरच प्रकरण मिटत आहे अन्यथा अनर्थ ही घडू शकतो. पोलीस पथक एकच दिवस सोबत होते. पोलीस पथकासाठी पालिकेला आठ हजार रूपये दररोज मोजावे लागत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी मोरे यांनीच पोलीस पथकावर पैसे खर्च न करता कर वसुली पथकासोबत वसुलीची मोहीम राबविण्यास सांगीतले आहे.
नगराध्यक्षांनी केली मध्यस्ती
नगर पालिकेच्या कर वसुलीत राजकीय हस्तक्षेप ही सर्वात मोठी अडसर असल्याचे बोलले जाते. मात्र त्याची प्रचिती शुक्रवारी आली. बग्गा इलेक्ट्रॉनिक्समध्ये पथक वसुलीसाठी गेले असता दुकानाच्या संचालकांनी मुख्याधिकारी मोरेंसोबत चांगलीच बाचाबाची केली. एवढेच नव्हे तर त्यांनी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांना फोन लावला व त्यांनी प्रकरणी मध्यस्ती केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी रोख किंवा धनादेश मिळत नाही तोपर्यंत तेथून निघणार नसल्याचे स्पष्ट सांगीतले. यावर मात्र नगराध्यक्ष जायस्वाल यांनी शनिवारी सकाळी ११ वाजतापर्यंत संबंधीतांचा धनादेश कार्यालयात जमा करण्याची गॅरंटी दिली.