कोविन ॲपच्या हाताळणीसाठी ऑपरेटर्सना प्रशिक्षण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:45+5:302021-01-16T04:33:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शनिवारपासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ होणार असून, त्यासाठी जिल्ह्यालाही लसींचा पुरवठा करण्यात आला ...

कोविन ॲपच्या हाताळणीसाठी ऑपरेटर्सना प्रशिक्षण ()
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शनिवारपासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ होणार असून, त्यासाठी जिल्ह्यालाही लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, लसीकरणाचा संपूर्ण खेळ ‘कोविन ॲप’वर अवलंबून असल्याने हे ॲप व्यवस्थित हाताळता यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून डाटा एंट्री ऑपरेटर्सना शुक्रवारी (दि. १५) विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
अवघ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी भारतात २ लसी तयार करण्यात आल्या आहेत. शनिवारचा (दि. १६) मुहूर्त साधून अवघ्या देशात जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सज्ज असून, डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासह लसीकरण मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींचे वितरणसुद्धा करण्यात आले असून, जिल्ह्याला १० हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. या लसीकरणासाठी टप्पाटप्पाने नियोजन करण्यात आले आहे. या लसीकरण कार्यक्रमात सर्वात महत्वाची भूमिका कोविन ॲपची राहणार असून, या ॲपमध्ये नोंदणी करणाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. म्हणजेच लसीकरणाच्या या मोहिमेची सुरूवातच कोविन ॲपपासून होणार असून, लसीकरण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कोविन ॲपची अचूक हाताळणी करणे गरजेचे आहे. यामध्ये जर एखादी चूक झाली तर त्याचा प्रभाव संपूर्ण कार्यक्रमावर पडणार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. येथे डाटा एंट्री ऑपरेटर्सची भूमिका महत्वाची राहणार असून, यासाठीच त्यांना शुक्रवारी विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
---------------------------
२५ ऑपरेटर्स व ५ परिचारिकांचा सहभाग
‘कोविन ॲप’ची अचूक हाताळणी करता यावी, यासाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षणात २५ ऑपरेटर्स तसेच ५ परिचारिकांनी सहभाग घेतला होता. त्यांना युएनडीपीचे प्रकल्प अधिकारी अश्विनी नागर तसेच लसीकरणाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय पांचाळ यांनी प्रशिक्षण दिले.
.......
लसीकरण केंद्रावर पोहोचवल्या लसी
शनिवारपासून कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, देवरी या केंद्रांवर एकूण ३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी या तिन्ही केंद्रांवर लसींचा पुरवठा शुक्रवारी करण्यात आला.
......
लसीकरण मोहिमेबाबत उत्साह
गेले वर्षभर सर्वत्र कहर केलेल्या कोरोनावर लस उपलब्ध झाल्याने शनिवारपासून लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाला शनिवारी सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील तीन केंद्रांवरुन सुरुवात हाेणार आहे. यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच या लसीकरण मोहिमेबद्दल उत्सुकतासुध्दा आहे.