लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हृदय, किडनी आणि यकृत यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी १० ते ३० लाख खर्च येतो. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केवळ किडनी प्रत्यारोपण खर्चाचा समावेश आहे. त्यामुळे हृदय, यकृत, कॉर्नियाचा महागडा खर्च उचलणे सामान्यांसह गरीब रुग्णांना परवडणारे नाही. गरीब रुग्णांसाठी हृदय-यकृत प्रत्यारोपण अजूनही स्वप्नच आहे.
विदर्भात केवळ नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) व नागपूरच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेतून मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. परंतु या दोन्ही ठिकाणी या अवयवाची गरज असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे.
ज्यांच्याकडे पैसा त्यांचेच अवयव प्रत्यारोपणमृत्यूनंतर अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा निर्णयाने अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगणाऱ्यांना नवआयुष्य मिळत आहे; परंतु जनआरोग्य योजनेत केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा खर्च समाविष्ट असल्याने हृदय, किडनी आणि यकृत यासारख्या अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा खर्च जे उचलू शकतील त्यांनाच हे अवयव मिळत आहे.
सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी सरकारी मदतीची गरजअवयव प्रत्यारोपण हे अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरते; परंतु त्याचा खर्च खूप जास्त असतो. सरकारने प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वच अवयव प्रत्यारोपणाची निःशुल्क सोय उभी करायला हवी किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सर्व अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करायला हवा. ज्यामुळे प्रत्यारोपणाचा लाभ सर्व रुग्णांना घेता येईल. सामाजिक संस्थांनीसुद्धा यात सहकार्य करणे गरजेचे आहे.
"महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत केवळ किडनी ट्रान्सप्लांट समाविष्ट आहे. पूर्वी अडीच लाखांची तरतूद होती आता साडेचार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व 'एम्स'मध्ये ही शस्त्रक्रिया लाभार्थ्यांवर मोफत केली जाते. गोंदियात सध्या ट्रान्सप्लांट केले जात नाही."- डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिष्ठाता, गोंदिया