केवळ ८१ शेतकरी सावकारी जाचातून मुक्त
By Admin | Updated: September 12, 2015 01:37 IST2015-09-12T01:37:45+5:302015-09-12T01:37:45+5:30
शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत

केवळ ८१ शेतकरी सावकारी जाचातून मुक्त
६.७० लाखांची कर्जमाफी : जिल्हास्तरीय समितीच्या सभेत तिरोडा तालुक्याची यादी मंजूर
गोंदिया : शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत तिरोडा तालुक्यातील ८१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीच्या सभेत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून या शेतकऱ्यांचे सहा लाख ७० हजार ३६६ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र जिल्हाभरात हजारो शेतकरी सावकारी कर्जाच्या जाचात अडकले असताना मोजक्याच शेतकऱ्यांची यातून मुक्तता झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नैसर्गिक संकटाने कंबरडे मोडून बसलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकारांकडून कर्ज घेऊन शेती करावी लागते. अशात सावकार या शेतकऱ्यांकडे असेल-नसेल ते सुद्धा घेऊन घेतात. परिणामी कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण याच कारणांमुळे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जगाचा पोशिंदाच गळफास लावून आपला जीव देत असल्याचा हा गंभीर प्रकार जिल्ह्यात सुद्धा वाढत चालला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारी कर्जाच्या पाशातून मोकळे करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला.
राज्य शासनाने १० एप्रिल रोजी परवानाधारक सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला माफी देण्यासाठी कर्जमाफीची योजना मंजूर केली. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांकडून त्यांनी कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले. यात हजारावर प्रस्ताव तालुकास्तरावर प्राप्त झालेत, तर तालुकास्तरावर सावकारांनी सादर केलेल्या या प्रस्तावांची छाननी करून जिल्हा उपनिबंधकांकडे तिरोडा तालुक्यातील ८१ प्रस्ताव देण्यात आले.
दरम्यान ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या सभेत तिरोडा तालुक्यातील या ८१ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. त्यात शेतक ऱ्यांचे सहा लाख ७० हजार ३६६ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. यासाठी संबंधित परवानाधारक सावकाराला कर्जदाराकडून घेतलेल्या तारण वस्तू परत कराव्या लागतील. नंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सावकाराच्या खात्यावर रक्कम जमा होणार व त्यानंतरच संबंधित कर्जदार शेतकऱ्यांस कर्जमुक्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे.
या सभेला पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, समितीचे सदस्य सचिव जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुपे, सहायक निबंधक ए.बी.गोस्वामी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
कर्जमाफीचे प्रस्ताव सादर करा
तिरोडा तालुक्याप्रमाणेच अन्य तालुक्यातील प्रस्तावांची तालुकास्तरीय समितीकडून छाननी झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविले जाणार आहे. जिल्हा उपनिबंधकांकडील प्रस्तावांना जिल्हास्तरीय समितीत मांडले जाणार असून त्यांची छाननी करून मंजुरी दिली जाईल. त्यामुळे ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रस्ताव अद्यापही सावकारांनी सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर केले नाही त्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी केले आहे.