अरे बापरे... आठ दिवसात १००० कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:20+5:30
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार झाला आहे. तर आठ दिवसात १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवीन विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांसह मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

अरे बापरे... आठ दिवसात १००० कोरोना रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १ ते ८ सप्टेंबर दरम्यान तब्बल एक हजार कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा चांगलाच उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रुग्ण वाढीचा आकडा तीन आकडी झाला असल्याने जिल्हावासीयांच्या तोंडातून अरे बापरे... हेच वाक्य निघत आहे.
जिल्ह्यात मार्च ते जुलै या पाच महिन्याच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधित होते तर ४ बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र आॅगस्ट महिन्यापासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
आॅगस्ट महिन्यात ११९३ कोरोना बाधित आणि १४ कोरोना बाधिताचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र होते. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होईल असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तविला जात होता. मात्र अंदाज देखील पूर्णपणे फसला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार झाला आहे. तर आठ दिवसात १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या आकड्याचा नवीन विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना बाधितांसह मृतकांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
सप्टेंबर महिन्यातील कोरोना रुग्ण मृत्यूचा दर १.४ टक्के झाला आहे. त्यामुळे हा महिना कोरोना उद्रेकाचा ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोरोना बाधितांचा मृत्यूदर १.४
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोना बाधितांच्या मृत्यू संख्येत सुध्दा वाढ होत आहे. १ ते ८ सप्टेंबर दरम्यान १ हजार कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा मृत्यू दर १.४ टक्के झाले आहे. तर अजुनही संपूर्ण महिना बाकी असून मृतकांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुध्दा विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
असा वाढला कोरोनाचा ग्राफ
जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर जवळपास दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र मे महिन्यापासून पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली.मार्च महिन्यात १, मे ६४, जून ८४, जुलै १४४, ऑगस्ट ११९४ आणि ८ सप्टेंबरपर्यंत १००१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.