कोरोना रूग्ण संख्या वाढतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:57+5:30

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्यास सुरूवात झाली असून दररोज निघत असलेले रूग्ण बघता आरोग्य विभागाचे प्रयत्न कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, शहरातील बाजारातील गर्दी बघता नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसते.

The number of corona patients is increasing | कोरोना रूग्ण संख्या वाढतीच

कोरोना रूग्ण संख्या वाढतीच

ठळक मुद्दे२६ रु ग्णांची आणखी भर : २९ रूग्ण कोरोनामुक्त, अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २७६

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : काही केल्या जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हावासीयांत दहशत माजली आहे. त्यातच रविवारी (दि.१६) प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून २६ जणांना बाधा झाल्याचे निदान झाले. तर २९ रु ग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
रविवारी (दि.१६) जे २६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील १७, आमगाव तालुक्यातील ३, तिरोडा तालुक्यातील २ तर ४ रूग्ण सडक-अर्जुनी तालुक्यातील आहेत. सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तालुक्यातील रूग्ण संख्या जास्त असल्याने हे दोन्ही तालुके जिल्ह्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजार परिसरात रूग्ण आढळून येत असल्याने शहरवासीयांना धडकी भरली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील एकही भाग सुटलेला नाही.
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट होण्यास सुरूवात झाली असून दररोज निघत असलेले रूग्ण बघता आरोग्य विभागाचे प्रयत्न कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, शहरातील बाजारातील गर्दी बघता नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसते. तर हे चित्र बघता प्रशासनाकडून या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही केले जात नसल्याचेही दिसत आहे. परिणामी आता जिल्ह्यात दररोज झपाट्याने रूग्ण संख्या वाढत असून ही स्थिती लवकरच नियंत्रणात आणण्याची गरज आहे. शहरातील मुख्य भागांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्ह्यातील स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

गरज असल्यास घराबाहेर पडा
कोरोनापासून बचावासाठी शासनाकडून सुरूवातीपासूनच ‘घरी रहा-सुरक्षित रहा’ हा मंत्र दिला जात आहे. मात्र नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अवघ्या देशालाच कोरोनाने विळखा घातला असून तो अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. आता जिल्ह्याचीही तीच स्थिती झाली असून नागरिकांत घबराट माजली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली ही रूग्ण संख्या बघता आता नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून गरज असल्यास घरातून बाहेर पडावे अशी स्थिती आहे.

११ हजार ३७६ नमुने निगेटिव्ह
४येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १२ हजार ७५० नमुने पाठविण्यात आले. यामध्ये ११ हजार ७३६ नमुने निगेटिव्ह आले. तर ६५९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ४१ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ३१३ नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे. तर विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १९८ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ८५७ व्यक्ती अशा एकूण १ हजार ५५ व्यक्ती विलगिकरणात आहेत. 


मृतांची संख्या झाली ९
४जिल्ह्यातील कोरोनामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ८ असतानाच शुक्रवारी (दि.१४) रात्री आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या ९ वर पोहचली आहे.

Web Title: The number of corona patients is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.