पक्ष्यांच्या संख्येत १५ हजारांनी वाढ!

By Admin | Updated: March 13, 2015 01:53 IST2015-03-13T01:53:37+5:302015-03-13T01:53:37+5:30

वन व वन्यजीव विभागाच्या वतीने २१ डिसेंबर २०१४ आणि ११ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्यातील आठ तलावांवर आणि नवेगावबांधच्या सहा बोडी तसेच कालव्यांवर पक्षीगणना करण्यात आली.

Number of birds increased by 15 thousand! | पक्ष्यांच्या संख्येत १५ हजारांनी वाढ!

पक्ष्यांच्या संख्येत १५ हजारांनी वाढ!

लोकमत शुभवर्तमान
देवानंद शहारे गोंदिया
वन व वन्यजीव विभागाच्या वतीने २१ डिसेंबर २०१४ आणि ११ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्यातील आठ तलावांवर आणि नवेगावबांधच्या सहा बोडी तसेच कालव्यांवर पक्षीगणना करण्यात आली. यात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीमध्ये झालेल्या गणनेत तब्बल १५ हजार १०२ पक्षी जास्त आढळले आहेत. पक्ष्यांची ही वाढती संख्या पक्षीप्रेमींसह वनविभागाला दिलासा देणारी आहे.
नवेगावबांधचे पक्षी निरीक्षण केंद्र ते संजय कुटी कालवा, संजय कुटी ते कोहळीटोला, कोहळीटोला ते धाबेपवनी, धाबेपवनी ते धाबेटेकडी आणि जांभळी, जांभळी ते येलोडी, रामपुरी ते रांझी टोक, ते गम्पी बोडी या ठिकाणी पक्षीगणना करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील बदबद्या, खुर्शीपार, चांदोरी (ऊसगाव), रेंगेपार (कोटा), रिसाला, खोद्या, रेंगेपार व खजरी इत्यादी १४ ठिकाणी ११ जानेवारी रोजी पक्षीगणना करण्यात आली. तत्पूर्वी २१ डिसेंबर २०१४ रोजी जिल्ह्यातील एकूण १५ ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली होती.
डिसेंबर २०१४ च्या गणनेत रहिवासी, स्थानिक स्थलांतरीत व स्थलांतरीत असे एकूण १२ हजार ९२७ पक्षी विविध प्रजातींचे आढळले, तर जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या गणनेत एकूण २८ हजार ०२९ पक्षी आढळले. त्यामुळे जानेवारी महिन्यात तब्बल १५ हजार १०२ पक्ष्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात प्राणी अभयारण्य व्हावे अशी येथील वन्यप्रेमींची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यामुळे ही आकडेवारी त्यांच्या या मागणीला बळ देणारी ठरणार आहे. त्यादृष्टीने हे शुभवर्तमान ठरत आहे.
जानेवारीत आढळलेले विविध तलावांवरील पक्षी
पक्षी अभिव्यक्ती केंद्र ते संजय कुटी कालव्यापर्यंत दोन हजार ५६८ पक्षी, संजय कुटी ते कोहळीटोला येथे चार हजार ६६०, कोहळीटोला ते धाबेपवनी नऊ हजार ६१०, धाबेटेकडी-जांबळी एक हजार ७४७, येलोडी चार हजार १३२, रामपुरी-रांझीटोक-गम्पी बोडी तीन हजार ७३३, बदबद्या तलाव २००, खुर्शीपार तलाव ७३०, चांदोरी-ऊसगाव तलाव १३५, रेंगेपार (कोटा) तलाव २०५, रिसाला तलाव ४४, खोद्या तलाव १८, रेंगेपार तलाव ५३, खजरी तलाव येथे १०४ असे एकूण २८ हजार ०२९ विविध वर्गातील विविध प्रजातींचे पक्षी आढळले.
डिसेंबर २०१४ मधील पक्षी संख्या
पक्षी अभिव्यक्ती केंद्र ते संजय कुटी कालव्यापर्यंत एक हजार ७८२ पक्षी, संजय कुटी ते कोहळीटोला येथे एक हजार ६७१, कोहळीटोला ते धाबेपवनी पाच हजार ७८७, धाबेपवणी ते धाबेटेकडी ७३०, धाबेटेकडी ते जांभळी ४१३, जांभळी ते येलोडी एक हजार एक, रामपुरी ते रांझी टोक २४९, रांझी टोक ते गम्पी बोडी १३२, मोगरा तलाव २१, सौंदड तलाव ४२, गौरीडोह तलाव ५३९, बदबद्या तलाव ६१, राजडोह सरोवर ११४, अजनी हमेशा सरोवर २१७ व खुर्शीपार सरोवर १६८ असे एकूण १२ हजार ९२७ विविध वर्गाच्या विविध प्रजातींचे पक्षी आढळले.

Web Title: Number of birds increased by 15 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.