आता निर्मल गावांची वाटचाल पुन्हा हागणदारीकडे
By Admin | Updated: June 25, 2014 00:31 IST2014-06-25T00:31:33+5:302014-06-25T00:31:33+5:30
संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले होते. त्यावेळी अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. मात्र हागणदारीमुक्त गावांतील रस्त्यावरच

आता निर्मल गावांची वाटचाल पुन्हा हागणदारीकडे
गोंदिया : संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले होते. त्यावेळी अनेक गावे हागणदारीमुक्त झाली. मात्र हागणदारीमुक्त गावांतील रस्त्यावरच नागरिक शौचास बसत असल्याने पुन्हा एकदा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
प्रशासनाचे सहकार्य व कर्तव्यदक्ष अधिकारी असले तरच अभियान प्रामाणिकपणे राबविल्या जाते. अन्यथा त्याचा नागरिकांवर कोणताही परिणाम होत नाही. नागरिक या अभियानाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. जिल्ह्यात अनेक गावांच्या नागरिकांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. स्वच्छता अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावाला भेटी देऊन नागरिकांना आरोग्याचे तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे मत परिवर्तन करण्यात यश मिळविले होते. ज्यांना याबाबत काही अडचणी असतील तर त्या जाणून घेऊन तालुक्याच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून मार्ग काढण्यात मदत केली होती.
जिल्ह्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे ही त्या मागचा उद्देश होता. मात्र ज्या गावांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला अशा गावात रासेयो शिबिरे घेण्यात आली होती. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी गावात ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. त्यांच्याकडे शोषखड्डे खोदून दिले. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना शासनाने सुरूवातीला ६०० रूपये, १२०० नंतर २४०० रुपयांचे अनुदान दिले. परंतु अनेक ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकांनी अनुदानामध्येसुध्दा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. या भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत पथकही नेमण्यात आले होते. हे पथक गावात सकाळी, संध्याकाळी भेटी देत असत.
उघड्यावर शौचास बसणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला होता. प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती.
नागरिकांना शौचालय बांधण्यास सक्ती करण्यात येत होती. यात कुठेही वाद निर्माण झाल्यास त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत होती. कायद्याचा धाक निर्माण करून तर कधी जागरूक करुन मोहीम राबविण्यात येत होती. यामुळे गावे हागणदारीमुक्तीचे महत्त्व नागरिकांना पटल्यामुळे अनेक शौचालये गावागावांत बांधण्यात आली. अनेक गावात खुद्द ग्रा.पं. पदाधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचेकडेच शौचालय नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत होती. तेवढीच तत्परता दाखवून अभियान राबविण्यात आले होते. शौचालय न बांधणाऱ्यांनी नळजोडणी काढून घेऊन, रेशन बंद करून त्यांचेवर शौचालय बांधणे सक्तीचे करण्यात आले होते. काही गावांनी समजूतदारपणा दाखवीत या अभियानांतर्गत आपले गाव हागणदारीमुक्त केले. परंतु अनेक गावे अद्यापही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सद्यस्थितीत मात्र या अभियानाचा कुठेही प्रभाव दिसून येत नाही. एकंदरीत या अभियानाचा जिल्ह्यातील काही भागात पूर्णत: फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येते. काही लाभार्थ्यांनी केवळ नावापुरतेच शौचालये बांधून ठेवली आहे. तर काहींनी केवळ अनुदान उचलले व शौचालयाचे बांधकाम मात्र केले नाही. सकाळी गावात भेट देणाऱ्या अधिकारी वर्गापासून आता सुटका झाल्याचे समाधान काहीजण व्यक्त करीत आहेत. नागरिकांवर कायद्याचा बडगा असूनही त्यांची अंमलबजावणी करणारे तर प्रभावी नसेल तर नागरिकांवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
आपले भले कशात आहे, ही बाब नागरिकांना पटवून सांगणे हे कौशल्य प्रत्येकाला जमलेच असे नाही. हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाला आहे. सदर अभियानाची जिल्ह्यात यशस्वीपणे अमंलबजावणी करण्याकरिता संबंधित विभागाचे अधिकारी पुन्हा कामाले लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)