आता ठरलं १२ फेब्रुवारीला विराजमान होणार गावकारभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:30+5:302021-02-05T07:44:30+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. आता १२ ...

आता ठरलं १२ फेब्रुवारीला विराजमान होणार गावकारभारी
गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. आता १२ फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड केली जाणार असून त्यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी काढले आहे. त्यामुळे आता गावकारभारी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहेत. यंदा सरपंचाची निवड सदस्यांमध्ये केली जाणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले असेल तर त्या प्रवर्गाचा सरपंच विराजमान होणार आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये पॅनल निहाय सदस्य निवडून आले आहे. त्यामुळे एकाच पॅनलमध्ये सरपंच पदासाठी दोन तीन दावेदार आहे. तर काही पॅनलचे बहुमत असले तरी त्यांच्याकडे सरपंच पदाच्या प्रवर्गाचा सदस्य नसल्याने अडचण निर्माण झाली. त्यामुळे पळवापळवीचे राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हिच शक्यता लक्षात घेऊन राजकीय पक्ष व पॅनलने आपल्या सदस्यांना सरपंचपदाच्या निवडणुकीपर्यंत पर्यटनस्थळी पाठविले आहे. तर काही ठिकाणी सदस्य भूमिगत झाल्याचे चित्र आहे. १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे याच दिवशी गावकऱ्यांना आपल्या गावचा प्रमुख कारभारी कोण होणार हे कळणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष १२ फेब्रुवारीकडे लागले आहे.
.................
पर्यटनाला गेलेले सदस्य १२ ला परतणार
१२ फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या सदस्यांमध्ये कुठलीही फूट पडू नये यासाठी पर्यटनाला गेलेले सदस्य १२ फेब्रुवारीला सकाळीच आपल्या गावात परतणार आहेत. हे सदस्य नेमके कोणत्या ठिकाणी आहे याची फार गुप्तता त्या पॅनलकडून बाळगली जात आहे.
......
प्रमुखांची होतेय धांदल
सरपंच आणि उपसरपंच निवडची प्रक्रिया १२ फेब्रुवारीला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पॅनल प्रमुख आणि गावातील पक्षाच्या प्रमुखांची या पदी नेमके कुणाला विराजमान करायचे, असे करीत असताना इतर सदस्य नाराज होणार नाही ना याची सुद्धा काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वांचे मन राखताना प्रमुखांची चांगली धांदल उडत आहे.