आता लक्ष्य मारहाणमुक्त गावाचे
By Admin | Updated: May 12, 2014 23:51 IST2014-05-12T23:51:42+5:302014-05-12T23:51:42+5:30
व्यक्ती किंवा गटातील तंटे मिटवून गावात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावातील सज्जन व्यक्तींची साथ मिळाली.

आता लक्ष्य मारहाणमुक्त गावाचे
गोंदिया : व्यक्ती किंवा गटातील तंटे मिटवून गावात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावातील सज्जन व्यक्तींची साथ मिळाली. या मोहिमेला महिलांचा हातभार लागल्याने गाव शांततेच्या मार्गावर चालू लागले आहे. तरीदेखील गावात मारहाणीची प्रकरणे वाढू लागली आहेत. या मारहाणीवर आळा घालण्यासाठी राज्य शासन आता मारहाणमुक्त गावाचे लक्ष्य ठेवत आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य प्रयत्न करीत असले तरी कौटुंबिक पातळीवरील वादांमध्ये तोडगा काढण्यावर तंटामुक्त समित्यांना र्मयादा येत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना चार भिंतींच्या आत होत असल्याने ही प्रकरणे वाढत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असले, तरी गावात शंभर टक्के शांतता प्रस्थापित झाली नाही. जुने तंटे मिटवून नवीन तंटे उद्भवणार नाहीत याची काळजी मोहीम राबविणारे नागरिकच घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पंचायतमधील महिला प्रशिक्षण आणि संघटनांच्या क्षेत्रात काम करणारी महिला राजसत्ता आंदोलने मारहाणमुक्त गाव ही संकल्पना राबवीत आहे. महिलांवरील हिंसाचाराच्या तक्रारी लक्षात घेता गावामध्ये ५0 सदस्य असतील. अशी राजसत्ता आंदोलनाची प्रत्येक गावात एक शाखा उघडली जाणार आहे. या शाखेची पंधरवड्यात एक बैठक घेण्यात येणार आहे. या शाखेकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार आल्यावर प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. हे प्रकरण या शाखेकडे सुटले नाही तर ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे येते. समितीत तडजोड झाले नाही तर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंंत जाते. तेथेही तोडगा निघाला नाही तर तालुका पातळीवर शिष्टमंडळ तयार करून प्रयत्न केला जातो. समाजातील स्त्री किंवा पुरुषाला मारहाण केले जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. हा मारहाणीचा मुद्दा ग्रामसभेत मांडावा, एकमेकाने एकमेकाकडे लक्ष ठेवावे लागत आहे. कोणत्याही समस्येचा निकाल वर्षभरात लागावा, अशी या मागची भूमिका आहे. मारहाणमुक्त गावाबरोबर बालविवाहमुक्त गाव, भ्रूणहत्यामुक्त गाव याही संकल्पना राबविण्याचा मानस शासनाचा आहे. प्रत्येक घरात शांतता नांदण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल योग्य आहे. (तालुका प्रतिनिधी)