आता शहरातही ‘ट्रॅफिक सिग्नल’
By Admin | Updated: September 16, 2014 02:02 IST2014-09-16T02:02:10+5:302014-09-16T02:02:10+5:30
गोंदियातील अनियंत्रित वाहतूक, अरूंद रस्ते व वाहनांची

आता शहरातही ‘ट्रॅफिक सिग्नल’
अनियंत्रित वाहतूक सुधारणार : ४२ लाख ४७ हजारातून तयार होणार सिग्नल
नरेश रहिले गोंदिया
गोंदियातील अनियंत्रित वाहतूक, अरूंद रस्ते व वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक व्यवस्था बिघजली आहे. कुणी कोणत्याही रस्त्यावरून वाहन टाकून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अपघातही घडतात. या अस्ताव्यस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी गोंदिया शहरातील पाच चौकामध्ये ट्राफिक सिग्नल बसविण्यात येत आहे. यासाठी ४२ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही रक्कम केंद्र शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत पूर्ण करण्यात येत आहे.
गोंदिया शहरातील अरूंद रस्त्यामुळे रहदारीस नेहमी अडथळा निर्माण होतो. अडथळा निर्माण झाल्यास नागरिक आपल्या चुकीचे खापर पोलिसांच्या डोक्यावर फोडतात. नगर परिषदेचे दुर्लक्ष व शहरातील गल्यावर व्यापाऱ्यांचे वाढते अतिक्रमण या बाबीला लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा नेहमीच काम करीत असते. मात्र वाहतुकीची कोंडी झाल्यास प्रत्येक माणूस या कोंडीची जबाबदारी वाहतुक पोलिसांची आहे, असे ओरड करतात. परंतु कोंडी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतुक पोलीस गेले तर त्यांना सोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधीचे फोन ही वाहतुक पोलिसांना जातात. त्यामुळे गोंदिया शहरातील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. गोंदिया शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुक पोलीस नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी असतात. परंतु नियम तोडणाऱ्यां वाहन चालकांना वाहतुक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. तर ते वाहन चालक वाहन न थांबविता पळून जातात. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक, शक्ती चौक आणि विशाल मेगा मार्ट चौक या ठिकाणी ट्राफिक सिग्नल बसविण्यात येणार आहे. गोंदिया शहरात हे सिग्नल नसल्यामुळे कोणताही वाहन चालक कुठून ही घुसतो. यामुळे वाहतुकीचा बोजवारा नेहमीच उडाल्याचे लक्षात येते. या ट्राफिक सिग्नलसाठी वाहतुक पोलिसांनी महाराष्ट्र वितरण कंपनी याच्याकडे विद्युत कनेक्शनसाठी अर्ज केले आहे. या कामाचे कंत्राट नागपूर येथील डेकोफर्ण कंन्स्ट्रक्शनला दिले आहे. कंत्राटदाराने जयस्तंभ चौकातील व नेहरू चौकातील काम पूर्ण केले. मात्र आंबेडकर चौक, शक्ती चौक आणि विशाल मेगा मार्ट येथील काम संथगतीने सुरू आहे. या सिग्नल करिता लागणारे पाईप आणल्याशिवाय खड्डे खोदू नका, असा सल्ला वाहतुक निरीक्षक किशोर धुमाळ यांनी कंत्राटदारांना दिला आहे. येत्या महिन्याभरात गोंदिया शहरातील पाच ट्राफिक सिग्नल सुरू होणे अपेक्षित असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.
दोन टोर्इंग व्हॅन येणार
गोंदिया शहरातील अस्ताव्यस्त पार्कीगवर लगाम लावण्यासाठी वाहतुक पोलीस प्रत्येक महिन्याला मोहीम राबवून दुचाकींना उचलून नेतात. गोंदिया शहरातील बाजार परिसरात चारचाकी वाहने वाटेल तिथे उभे असतात.परंतु सध्या स्थितीत पोलिसांकडे ही चारचाकी वाहने उचलण्यासाठी योग्य साधने उपलब्ध नसल्यामुळे ते या चारचाकी वाहनावर कारवाई करीत नाही. दुचाकी उचलून वाहतुक कार्यालयात नेण्यासाठी पोलिसांना खाजगी वाहन भाड्याने करावे लागते. परंतु शासन २५ लाखाच्या दोन टोईंग व्हॅन सप्टेंबर अखेरपर्यंत गोंदिया पोलिसांना पाठविणार आहे. त्यामुळे गोंदिया शहरातील रस्त्यावर कुठे ही पार्कीग करणाऱ्या चारचाकी वाहनांची आता गय केली जाणार नाही.
सिग्नल मोडणाऱ्यावर होणार कारवाई
गोंदिया शहरात लागणाऱ्या पाच सिग्नलचे पालन वाहन चालकांनी करावे यासाठी ६ ते ८ महिने दोन वाहतुक पोलीस कर्मचारी प्रत्येक सिग्नलजवळ ठेवला जाणार आहे. सिग्नलचे नियम न पाळणाऱ्यांना किंवा सिग्नल जंम्पीग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शहरातील संपूर्ण रस्ते, मोकळे करण्यासाठी वाहतुक पोलीस काम करणार.
ट्राफिक सिग्नलसाठी आम्ही वितरण कंपनीचा कनेक्शनकरिता पाठपुरावा करीत आहोत. कंत्राटदाराकडून पाईप आले नाही. पाईप आल्यावर सिग्नलसाठी खोदकाम करण्यात येईल. दोन ठिकाणी खोदकाम झाले परंतु तिन ठिकाणी पाईप आल्याशिवाय खोदकाम होणार नाही. ट्राफिक सिग्नल लावणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. परंतु नागरिकांना सोईस्कर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सिग्नल बसविल्यानंतर हे सिग्नल चालविण्याची जबाबदारी व त्याचा बिलाचा भरणा करण्याची जबाबदारी नगर परिषदेकडे सोपवू.
-किशोर धुमाळ
पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा,गोंदिया