चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:11+5:302021-02-09T04:32:11+5:30
गोंदिया : शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीनंतर २७ जानेवारपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. शाळा सुरू ...

चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !
गोंदिया : शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीनंतर २७ जानेवारपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आता विद्यार्थी आई-बाबांकडे चॉकलेटपेक्षा सॅनिटायझर आणून द्या म्हणून हट्ट धरत आहेत. हा हट्ट चुकीचा नसल्याने आणि पाल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असल्याने पालकदेखील त्यांचा हट्ट पूर्ण करून त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे तब्बल दहा महिने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. मात्र आता शालेय शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांचा ठोका वाजला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात शाळा सुरू झाल्याने मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग यांचे पालन करणे अनिवार्य आहे. तसेच राज्य शासनानेसुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम लागू केले आहेत. तसेच शाळांतर्फेसुद्धा विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. तसेच वर्गखोलीमध्येसुद्धा फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
.....
दहा दिवसात एकही विद्यार्थी बाधित नाही
जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या ८२९ शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या. जवळपास ३५,५४४ विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत. तर शाळांमध्येसुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच शाळा सुरू होऊन दहा दिवसाचा कालावधी लोटला असला तरी एकही विद्यार्थी बाधित आढळलेला नाही.
.......
कोट :
शाळेत पहिल्याच दिवशी जाताना मास्क, सॅनिटायझर मी आवर्जून न विसरता घेऊन गेलाे. आई-बाबांनी पण मला शाळेत गेल्यानंतर कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, हे सांगितले होते. त्याचे मी काटेकोरपणे पालन केले. शाळेत जाताना स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझर आवर्जून नेतो. शाळा सुटण्याची वेळ लवकर असली तरी नियमाचे पालन करून आम्हाला शिकविले जाते. शाळेत प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग केली जाते.
- प्रेम नक्षीणे,
......
शाळा सुरू होऊन आता दहा दिवस झाले. तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने मला आनंद झाला. कोरोनाविषयीची भीती आता आम्हाला राहिलेली नाही. शाळेतसुद्धा प्रवेशद्वारावरच आमची थर्मल स्क्रीनिंग केली जाते. मुख्याध्यापक आणि शिक्षक आम्हाला प्रार्थनेच्या वेळी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करण्याचा सल्ला देतात. आई-बाबासुद्धा मला शाळेत गेल्यावर आवश्यक ती काळजी घेण्यास सांगतात. स्कूल बॅगमध्ये मी दररोज सॅनिटायझर नेतो.
- विशेष नेवारे, विद्यार्थी.
....
तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने शाळेत जाण्याचा आणि आपल्या सर्व वर्गमित्रांना भेटता येणार असल्याचा आनंद होता. पण मानात थोडी कोरोनाची भीतीसुद्धा होती. आई-बाबासुद्धा मी शाळेत जाताना मास्क, सॅनिटायझर या गोष्टींची आवर्जून विचारपूस करतात. मीसुद्धा दररोज न चुकता स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझर नेतो. चॉकलेटपेक्षा आता सॅनिटायझर महत्त्वाचे आहे.
- रोहन भांगे, विद्यार्थी.
......
जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती
पाचवी ते आठवीच्या शाळा ८२९
सुरू झालेल्या शाळा
८२९
विद्यार्थ्यांची उपस्थिती
३५,५४४
शिक्षकांची उपस्थिती
२,३४५