कोविड गर्भवतींसाठी ना रक्तपेढी ; ना आयसीयूची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:24+5:30
रूग्णालयात सेवा देणारे फक्त तीन डॉक्टर असताना कोविड रूग्णांचा भार त्यांच्यावरच टाकण्यात आला. त्या ठिकाणी कोविड रूग्णालय उभारायचे होते तर त्यासाठी कोविडचा काम करणारे पुरेसे प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ नियुक्त करणे गरजेचे होते. परंतु कोविड गर्भवतींसाठी एकाही प्रसूती तज्ज्ञांना त्या ठिकाणी पाठविण्यात आले नाही. गोंदियापासून अर्धा तास प्रवासाला लागतो अश्या ठिकाणी कोविड गर्भवतींसाठी व्यवस्था करण्याचा देखावा करण्यात आला.

कोविड गर्भवतींसाठी ना रक्तपेढी ; ना आयसीयूची सुविधा
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोविडसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवतींना कसलीही सेवा मिळत नाही.गोंदिया येथील केटीएस, वैद्यकीय महाविद्यालय व गंगाबाई स्त्री रूग्णालय हे तीन मोठे व मुख्यालयाचे रूग्णालय सोडून रजेगावच्या ग्रामीण रूग्णालयाला कोविड गर्भवतींची प्रसूती करणारे रूग्णालय तयार करण्यात आले. परंतु प्रसूती करण्यासाठी जे संसाधने लागतात त्याची सोय न करताच रूग्णालय सुरू करण्यात आल्याने विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
रजेगावचे ग्रामीण रूग्णालय ३० बेडचे आहे. या रूग्णालयात सर्पदंश झालेले, विंचवाचा दंश किंवा सामान्य आजार असणारेही ग्रामीण लोक या रूग्णालयात उपचारासाठी येतात. रूग्णालयात सेवा देणारे फक्त तीन डॉक्टर असताना कोविड रूग्णांचा भार त्यांच्यावरच टाकण्यात आला. त्या ठिकाणी कोविड रूग्णालय उभारायचे होते तर त्यासाठी कोविडचा काम करणारे पुरेसे प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ नियुक्त करणे गरजेचे होते. परंतु कोविड गर्भवतींसाठी एकाही प्रसूती तज्ज्ञांना त्या ठिकाणी पाठविण्यात आले नाही. गोंदियापासून अर्धा तास प्रवासाला लागतो अश्या ठिकाणी कोविड गर्भवतींसाठी व्यवस्था करण्याचा देखावा करण्यात आला. परिणामी गर्भवतींना यातना देऊन नागपूरला रवाना करण्यात आले. ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून प्रसूती केली जाते. त्या ठिकाणी रक्तसंकलनपेढी असणे अवाश्यक आहे.
प्रसूती दरम्यान रक्ताची गरज पडली तर त्यांना रक्त पुरवठा करणे सहज सोपे होते. परंतु रजेगाव येथे रक्तसंकलन पेढीच नाही. प्रसूती झाल्यानंतर जन्माला येणारे काही बाळ स्वस्थ नसतात त्यांना आयसीयूची गरज पडते.परंतु रजेगाव येथे आयसीयू नसताना त्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवतींसाठी प्रसूती करण्याचा निर्णय घेणे म्हणजे त्यांच्या जिवावर बेतविण्याचा बेत आहे.
सामान्य रूग्ण आणि कोविड पॉझिटिव्ह गर्भवतींना एकाच ठिकाणी ठेवणे म्हणजे त्या हॉस्पिटलमधील सर्व रूग्णांंना इन्फेक्शन करण्यासारखे आहे.
कोरोनाच्या काळात डॉक्टरांच्या पळवाटा
गर्भवतींच्या उपचारासाठी गोंदियात वेगळे हॉस्पीटल तयार करण्याची गरज होती. परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र हॉस्पीटल तयार करण्यात आले नाही.याकडे जिल्हा शल्यचिकीत्सक, वैद्यकीय अधिष्ठाता व जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष राहिले. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉक्टर कोरोनाच्या काळातही पळवाटा काढत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात आमची नियुक्ती असल्याने आम्ही फक्त टीचिंगच करू, आमचे टिचींग इन्स्टीट्यूट आहे. सेवा देण्याचे काम नाही अशी भाषा त्या डॉक्टरांच्या तोंडातून निघत असेल या डॉक्टरांवर कारवाई का केली जात नाही. गर्भवतींच्या उपचाराची ज्यांच्यावर धुरा आहे असे डॉक्टर जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधिष्ठाता यांचे ऐकायलाच तयार नाहीत. मग ते कुणाचे ऐकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सेवा नाकारणाऱ्यांचे परवाने रद्द करा
कोविडच्या कामात सेवा देण्यास जे डॉक्टर नकार देत असतील त्यांचे परवाने रद्द करा अशी मागणी ग्रामीण भागापासून शहरीभागापर्यंत होत आहे. कोरोनाचे जागतिक संकट उभे असताना कोरोना योध्दा म्हणून आपण ज्यांचा गवगवा करतो त्यातील काही लोक सेवाच देत नाही. काही डॉक्टर इमाने इतबारे काम करीत आहेत. तर बहुतांश डॉक्टर कामच करायला तयार नाहीत. जे डॉक्टर कोरोना रूग्णांना सेवा देणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याच मागणी जोर धरू लागली आहे.
गर्भवतींची ४८ तास भटकंती
कोरोनाच्या काळात कोणतीही गर्भवती महिला प्रसूतीसाठी आरोग्य संस्थेत आली तर तिला उपचारासाठी घेतले जात नाही. कोविड चाचणी झाली का अशी पहिली विचारणा केली जाते. कोविड तपासणी झाल्यावर तो अहवाल येण्यासाठी तब्बल ४८ तासाचा वेळ लागतो. तेव्हापर्यंत त्या गर्भवतींना आत घेतले जात नाही. त्यांना भटकंती करावी लागते.
कोविड पॉझिटिव्ह गर्भवतींसाठी कोविडचे स्वतंत्र हॉस्पीटल रजेगाव ग्रामीण रुग्णालयाला उभारण्याच्या सुचना एप्रिल महिन्यात आरोग्य उपसंचालक नागपूर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या.त्यानुसार रजेगाव येथे हे कोविड सेंटर सुरु करण्यात आले.
डॉ.संजीव दोडके, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय रजेगाव