महिनाभरात १०० ग्राहक झालेत ‘निर्भय’

By Admin | Updated: February 18, 2015 01:31 IST2015-02-18T01:31:40+5:302015-02-18T01:31:40+5:30

पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली.

'Nirbhay' has 100 subscribers in a month | महिनाभरात १०० ग्राहक झालेत ‘निर्भय’

महिनाभरात १०० ग्राहक झालेत ‘निर्भय’

गोंदिया : पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली. नळ कनेक्शनधारकांवर असलेल्या पाणीपट्टी करावरील व्याजाची माफी करणाऱ्या लाभदायक असलेल्या निर्भय योजनेचा गेल्या एक महिन्यात केवळ १०० ग्राहकांनी लाभ घेत व्याजाची रक्कम माफ करवून घेतली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला शहरातील घरगुती, औद्योगीक, बिगर घरगुती ग्राहक व नगर परिषदेवर पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुल करायची आहे. यासाठी मजीप्राने कंबर कसली असून तीन पथकांकडून कर वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र ग्राहकांकडून पैसे काढून घेणे तेवढे सहज नाही. मात्र कोटींच्या असलेली थकबाकीची रक्कम सोडणे शक्य नाही. अशात थकबाकीदारांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने शासनाने १६ जानेवारी पासून निर्भय योजना सुरू केली आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या ग्राहकांच्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाची रक्कम पूर्णपणे माफ केली जाणार आहे. यासाठी योजनेला मुदतवाढ दिली असून आता ग्राहकांना येत्या ३१ जुलैपर्यंत त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी भरावयाची आहे.
मजीप्राचे एकूण ११ हजार ३०० ग्राहक आहेत, तर नगर परिषदेचे आजघडीला ५० सार्वजनिक नळ कनेक्शन्स आहेत. विशेष म्हणजे नगर परिषदेचे २९० सार्वजनिक नळ होते. मात्र सन २००९ मध्ये मजीप्राने त्यात कपात करून ९० वर आणले. सन २०१३ मध्ये ७० कनेक्शन केले. २०१४ मध्ये आणखी कमी करून आज ५० सार्वजनिक नळ आहेत. (शहर प्रतिनिधी)
तीन पथकांमार्फत वसुली
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सुरू केलेल्या निर्भय योजनेचा आतापर्यंत १०० ग्राहकांनी लाभ घेतला आहे. लाभ घेणाऱ्या या त्या ग्राहकांकडून मजीप्राला सुमारे २.५० लाख रूपये प्राप्त झाले असून ग्राहकांची सुमारे पाच लाख रूपयांची व्याज माफी झाली आहे. थकबाकीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मजीप्राने तीन पथक तयार केले असून ते कर वसुली मोहीम राबवित आहेत. व्याज माफीच्या या मोहिमेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही केले जात आहे.
निर्भय योजनेचे स्वरूप
या योजनेंतर्गत थकबाकीदाराकडे (नळकनेक्शधारक) थकित असलेल्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेची माफी केली जाणार आहे. यासाठी थकबाकीदारांनी आपले नाव मजीप्राकडे नोंदवायचे आहे. थकबाकीदारांना ही योजना लागू झाल्यापासून पूर्ण कालावधीत एकरकमी रक्कम भरण्याची मुभा असेल, मात्र यासाठी कार्यालयात उपलब्ध विहीत प्रपत्रात निर्भय योजनेत सहभागी होणे आवश्यक राहील. ज्या थकबाकीदारांकडील पाणीपट्टी विलंब आकारासह थकीत आहे व असे ग्राहक जे मूळ पाणीपट्टी रक्कम पूर्णत: म्हणजेच १०० टक्के भरतील, त्यांनाच निर्भय योजनेत १०० टक्के माफीचा लाभ मिळेल. ज्या ग्राहकांनी याआधी मुळ रक्कम भरली आहे व त्यांच्याकडे व्याजाची रक्कम असल्यास त्या ग्राहकांनाही १०० टक्के व्याजमाफीचा लाभ घेण्यासाठी या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ग्राहकांची नळ जोडणी कापण्याची मोहीम सुरू होणार आहे.

Web Title: 'Nirbhay' has 100 subscribers in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.