राज्याच्या सीमेवर नवीन एओपी
By Admin | Updated: December 23, 2014 23:05 IST2014-12-23T23:05:57+5:302014-12-23T23:05:57+5:30
मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवर नवीन एओपी मंजूर झाली आहे. त्या एओपीचे बांधकाम मागील दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले. चोख बंदोबस्तात महिनाभरात या एओपीचे काम

राज्याच्या सीमेवर नवीन एओपी
नक्षलवाद्यांना चाप : जिल्ह्यात एओपींची संख्या झाली नऊ
गोंदिया : मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवर नवीन एओपी मंजूर झाली आहे. त्या एओपीचे बांधकाम मागील दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले. चोख बंदोबस्तात महिनाभरात या एओपीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सालेकसा तालुक्याच्या मुरकुटडोह येथे शासनाने मागील सहा महिन्यापूर्वी एओपी सुरू करण्याला मंजुरी दिली. परंतु मंजुरी नंतर लगेचच निवडणुकीचे वेध लागल्यामुळे या एओपीकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर पोलिसांनी मुरकुटडोह येथे एओपी बांधण्यासाठी जागा शोधली मात्र त्यांना जागा मिळाली नाही. परिणामी ही एओपी पिपरीया येथे आणण्यात आली. पिपरीया येथील बाजार परिसरात ही एओपी उभारण्यात येत आहे. या ठिकाणापासून छत्तीसगडचा नवाटोला तीन कि.मी. अंतरावर तर मध्य प्रदेशची सीमा सहा कि.मी. अंतरावर आहे. छत्तीसगड व मध्य प्रदेशात वावरणारे नक्षलवादी गोंदिया जिल्ह्यात आराम करायला येत असल्यामुळे त्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस पिपरीया येथे एओपी उभारत आहे. या एओपीला नागरिकांचे सहकार्य असून वनविभागाची जागा देण्यात आली आहे.
या एओपीचे बांधकाम करण्यासाठी सी-६० एसआरपी कंपन्या व स्थानिक पोलीस चोख बंदोबस्त करणार आहेत. हे बांधकाम सुरू करण्याच्या पूर्वी नक्षलवाद्यांनी रस्त्यावर सुरुंग पेरुन तर ठेवला नाही यासाठी पोलिसांनी रोड ओपनिंग करीत त्या एओपीच्या जागेपर्यंत पोहोचले आहेत. या एओपीचे बांधकाम युद्ध स्तरावर सुरू आहे. तेव्हापर्यंत सी-६० च्या अनेक कंपन्या, एसआरपीचे दल चोख बंदोबस्त करणार आहेत. शिवाय जंगल सर्च मोहीम सी-६० व एसआरपीच्या कंपन्या करीत आहेत.
मागील दीड वर्षापूर्वी मुरकुटडोह करीता एओपी मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला सहा महिन्यापूर्वी मंजूरी देण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)