लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४२५ अधिपरिचारिका व परिसेविकांची पदे मंजूर आहेत. पण, केवळ १४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ४५ रुग्णांच्या सुश्रूषेसाठी केवळ एक स्टाफ नर्स कार्यरत आहे. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५१० खाटा उपलब्ध आहेत. या रुग्णालयात गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड जिल्ह्यातील रुग्णदेखील उपचाराकरिता येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे चांगल्या सुविधा मिळतील, या आशेने गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येतात. परंतु, रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर बऱ्याच रुग्णांना निराश होऊन परतावे लागते. या ५१० खाटांच्या रुग्णालयात ३७५ अधिपरिचारिका आणि ५० परिसेविकांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी अधिपरिचारिकांची १२९ तर १६ परिसेविकांची पदे भरण्यात आली आहेत. यातील ७४ अधिपरिचारिका केटीएस रुग्णालयात, तर ४५ कर्मचारी बाई गंगाबाई रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णसेवा करताना कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे. ४५ रुग्णांचा भार एका स्टाफला सांभाळावा लागत आहे.
हाफकिनचा औषध पुरवठा ठरतोय डोकेदुखी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २० टक्के औषधसाठा शासनाने नेमून दिलेल्या मुंबई येथील हाफकिन या संस्थेकडून पुरविण्यात येतो. मात्र, नेहमीच औषधसाठा वेळेत आणि नियमित पुरविण्यात येत नाही. परिणामी रुग्णांना पाहिजे तो उपचार मिळू शकत नाही. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाने अनेकदा पत्रव्यवहार केला आहे.