स्वच्छ ग्राम योजनेचे चिंतन करणे आवश्यक
By Admin | Updated: December 9, 2014 22:53 IST2014-12-09T22:53:49+5:302014-12-09T22:53:49+5:30
जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सुचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली.

स्वच्छ ग्राम योजनेचे चिंतन करणे आवश्यक
देवरी : जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सुचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली. यासाठी देवरीच्या छत्रपती शिवाजी लॉनमध्ये मेळावाही पार पडला. या मेळाव्यानंतर देवरी गावातील सहा वॉर्डात सहा पथकांच्या माध्यमातून सुमारे ६०० अधिकारी-पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात स्वच्छता केल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यावर खर्चही करण्यात आला. परंतू या मेळाव्याच्या आयोजनातून साध्य काय झाले? याचे चिंतन करणे आवश्यक आहे.
सविस्तर असे की, या स्वच्छ ग्राम योजनेच्या माध्यमातून देवरी गावात फिरून फोटो काढण्यापलीकडे या अभियानातून काहीही साध्य झाले नाही. स्थानिक ग्रा.पं.चे पदाधिकाऱ्यांच्या आपसी कलहामुळे ते फारसे उत्साहित नसल्याचे दिसले. शिवाय देवरी येथे राजीव गांधी गतीमानता अभियानांतर्गत ५२ जि.प. सदस्यांचे यशदामार्फत प्रशिक्षण सुरू होते. मात्र बोटावर मोजण्याइतक्या पाच-दहा सदस्यांनी या मेळाव्यात लावलेली हजेरी या अभियानाच्या यशस्वितेबद्दल बरेच काही सांगून गेली.
देवरी शहरात जेथे घाणीचे साम्राज्य आहे तिथे साफसफाईची गरज आहे. त्याकडे जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ स्वच्छ असलेल्या रस्त्यांवरच फिरून फोटोसेशन करण्यापुरता सदर कार्यक्रम होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दुसऱ्या दिवशी लोकांनी शासकीय कार्यालयांंना भेट दिल्यावर कार्यक्रमात आघाडीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचेच शासकीय कार्यालय व परिसर घाणीने माखलेला दिसला. यावरून जनतेत जो संदेश जायचा तो गेलाच.
निर्मल ग्राम योजनेत या जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ३२७ ग्रामपंचायत निर्मल झाल्याचा रेकार्ड जि.प. कडे आहे. आता स्वच्छ ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक जि.प. सदस्याला एक गाव दत्तक घ्यायचे आहे. ही योजना जाहीर होताच काही चलाख जि.प. सदस्यांनी मनोमन गावांची निवडसुध्दा करून टाकली. यात राज्यस्तरापासून तर तालुकास्तरावर पुरस्कार प्राप्त गावांचादेखील समावेश आहे. यामुळे या सुंदर योजनेचे वाटोळे करण्याचे आधीच शिजले, अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. असे झाले तर मागील सरकारवर दोषारोप करीत आम्हीच या गावांचा कायापालट केला, अशी फुशारकी मारली जाण्याची शंका आहे. त्यामुळे जि.प. अध्यक्षांनी या बाबींकडे लक्ष देऊन अतिमागास व जी गावे अद्यापही स्वच्छतेच्या बाबतीत समोर आलीच नाही, अशा गावांना सदस्यांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे.
देवरी येथील स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करताना जनतेचा किंवा ज्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक होते. त्यांचा थेट संबंध स्वच्छतेशी येतो. एका ठिकाणी मेळावा आयोजित करून आणि त्या मेळाव्यात केवळ अधिकारी आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याचे धोरण राहिले तर स्वच्छता वियषक चळवळींना यश येणे शक्य नाही. फक्त आदेश म्हणून हजर रहायचे आणि शासकीय पैशांची उधळपट्टी करायची यात फारसे काही साध्य होऊ शकत नाही. शिवाय ज्या अधिकाऱ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता किमान त्यांचे कार्यालय किंवा परिसर तरी स्वच्छ आहेत की नाही, हे तपासण्याची तसदी कोणी घेतल्याचे ऐकिवात नाही. यासाठी प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत. (प्रतिनिधी)