काँग्रेसच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी व्यथित
By Admin | Updated: August 10, 2014 23:04 IST2014-08-10T23:04:10+5:302014-08-10T23:04:10+5:30
नुकत्याच आटोपलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार राकेश ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने

काँग्रेसच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी व्यथित
गोंदिया : नुकत्याच आटोपलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार राकेश ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने व्यथित होऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जे नगरसेवक अनुपस्थित होते त्यांना पक्षाने उसकवण्याचा प्रश्नच नसून काँग्रेसचा हा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिव शर्मा यांनी एका पत्रकातून स्पष्ट केले.
गोंदिया नगर पालिकेवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. परंतू दोन दिवसांपूर्वी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसबहुल तीन नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे सत्ताधारी दोन्ही काँग्रेस अल्पमतात येऊन त्यांना सत्ता गमवावी लागली.
न.प.अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भाजप-सेनेचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक अनुपस्थित होते. शिवाय एका नगरसेवकाने तटस्थ राहून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले नाही. परिणामी १७ विरूद्ध ११ अशा ६ मतांनी काँग्रेसचे राकेश ठाकूर यांना तर १७ विरूद्ध १२ अशा ५ मतांनी राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर वालदे यांचा पराभव झाला.
नगर पषिदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाची भूमिका वठविण्याची वेळ आल्याने हा पराभव काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यातूनच राकेश ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रक काढून राष्ट्रवादीच्या अनुपस्थित असलेल्या ४ नगरसेवकांमुळेच पराभव झाल्याचे सांगत धोका दिल्याचा आरोप राष्ट्रवादीवर केला. त्या नगरसेवकांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली. प्रसिद्ध पत्रक काढून जाहीरपणे व्यक्त केलेल्या या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ही भूमिका चिंताजनक असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशा पद्धतीने पत्रकबाजी करणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाहक बदनाम करणे योग्य नसल्याचे शहराध्यक्ष शर्मा यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये सामंजस्य नसल्याचे उघडपणे दिसून येत आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)