प्रजासत्ताक दिनापूर्वी सालेकसात लागले नक्षलवाद्यांचे पत्रक, एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 18:29 IST2022-01-25T18:23:43+5:302022-01-25T18:29:03+5:30
मंगळवारी हे बॅनर सालेकसा-दरेकसा रोडवरील शारदा मंदिराजवळ लावण्यात आले होते. पोलिसांच्या लक्षात येताच ते बॅनर वेळीच काढून घेण्यात आले.

प्रजासत्ताक दिनापूर्वी सालेकसात लागले नक्षलवाद्यांचे पत्रक, एकच खळबळ
गोंदिया : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवसाआधी सालेकसा येथे नक्षली बॅनर व पोस्टर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस ठाणेपासून १ किलोमीटर अंतरावरच पोस्टर व बॅनर मिळाले. नक्षलवाद्यांनी या पत्रकात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. पोलिसांच्या लक्षात येताच ते बॅनर वेळीच काढून घेण्यात आले.
जिल्ह्यातील सालेकसा येथे मंगळवारी (दि.२५) सकाळी नक्षलवाद्यांनी चक्क सालेकसा पोलीस ठाणेपासून १ किलोमीटर अंतरावर शारदा मंदिराजवळ बॅनर लावले असून, जागोजागी पत्रके टाकली. सालेकसा हा तालुका नक्षलग्रस्त असून, येथे अनेकदा नक्षल चळवळी होत असतात. या भागात सालेकसा-दरेकसा दलम कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांत नक्षल्यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते; पण या घटनेने नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
यातच आज सकाळी नक्षल बॅनर व पत्रके आढळल्याने पोलिसांनी सर्च मोहीम सुरू केली आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांची मुकुरडोह येथे चौकी आहे. सालेकसावरून २५ किलोमीटर अंतरावर ही चौकी आहे. तरीही नक्षलवादी या भागात छोट्यामोठ्या कारवाया करीत असतात.
एसटी कर्मचाऱ्यांचे नक्षलवाद्यांनी केले समर्थन
भारताची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीच्यावतीने पत्रक काढण्यात आले आहे. अनंत नावाच्या झोनल प्रवक्त्याची त्यात सही आहे. २१ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे; परंतु मुख्यमंत्री ठाकरे या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. परिवहन मंत्री संप सोडविण्यासाठी एकीकडे बैठका घेतात. तर दुसरीकडे संप चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न करतात. कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जात आहे. लाठीचार्ज केले जात आहे. पगारात ४१ टक्के वाढ तसेच दर महिन्याच्या ८ तारखेला पगार देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे, असा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे.