नक्षलग्रस्त तालुक्यात शिक्षक होणार फुल्ल
By Admin | Updated: September 13, 2015 01:39 IST2015-09-13T01:39:48+5:302015-09-13T01:39:48+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक ..

नक्षलग्रस्त तालुक्यात शिक्षक होणार फुल्ल
सुटीतही काम : तिसऱ्या दिवशीही बदली प्रक्रिया सुरूच
गडचिरोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून ही प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शनिवारी १२ सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार असल्याने प्रशासकीय सुटी असली तरी गडचिरोली जिल्हा परिषदेत मात्र बदली प्रक्रिया सुरूच होती. रात्री ८.३० वाजतापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. गेल्या दोन दिवसात जिल्हाभरातील शिक्षक, केंद्र प्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या बदल्या झाल्या. अहेरी उपविभागातून अनेक शिक्षक व शिक्षक संवर्गातील कर्मचारी आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज आदी उपविभागात बदलीवर पाठविण्यात आले. शनिवारी मात्र पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी समुपदेशनाद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे नक्षलग्रस्त एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी आदी तालुक्यात शिक्षकांची रिक्त असलेली पद आता भरली जातील, अशी शक्यता शिक्षकांनीच व्यक्त केली आहे. स्वत: शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे हे ही गेल्या तीन दिवसांपासून बदली प्रक्रियेत व्यस्त असल्याने त्यांनी बदल्यांच्या आकडेवारीबाबत सांगितले नाही.