नवेगाव राष्ट्रीय उद्यान ठरत आहे प्रेमीयुगुलांसाठी एकांताचे ठिकाण
By Admin | Updated: August 23, 2015 00:14 IST2015-08-23T00:14:47+5:302015-08-23T00:14:47+5:30
गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानासाठी दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची घोषणा होते.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान ठरत आहे प्रेमीयुगुलांसाठी एकांताचे ठिकाण
संतोष बुकावन अर्जुनी मोर.
गोंदिया जिल्ह्यात नवेगावबांध हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानासाठी दरवर्षी कोट्यवधीच्या निधीची घोषणा होते. मात्र प्रत्यक्षात हा निधी कुठे जिरतो हे कळायला मार्गच नाही. गेल्या पाच वर्षापासून झालेल्या विकास कामांचे अद्यापही लोकार्पण होऊ शकले नाही. केवळ आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून उलटसुलट उत्तरे देवून अधिकारी मोकळे होतात. लोकप्रतिनिधींना तर काही सोयरसूतकच नाही. अशा दृष्टचक्रात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा विकास खुंटला आहे. या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त होईल का? हा प्रश्न पर्यटनप्रेमींना पडला आहे.
नवेगावबांध, इटियाडोह, प्रतापगड या परिसरावर निसर्गाने अमाप सौंदर्याची उधळण केली आहे. एकेकाळी पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली, पक्षिमित्र डॉ.सलीम अली यांच्या वास्तव्यातून हे राष्ट्रीय उद्यान साकारले. सुमारे २५ वर्षापूर्वी या उद्यान परिसरात भेट दिल्यानंतर पर्यटक मोहीत होत असत, पण कालांतराने जसजसा या उद्यानाच्या विकासासाठी निधी प्राप्त होऊ लागला तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने उद्यानाला वक्रदृष्टी लागली. आज या उद्यानाची एवढी अवदशा झाली आहे की, येथे आल्यानंतर पर्यटकांनी नाक मुरडले नाही तर नवलच !
सद्यस्थितीत हे राष्ट्रीय उद्यान राहिले नसून स्कार्फ बांधून येणाऱ्या प्रेमीयुगलांसाठी एक निरव शांततेचे ठिकाण झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री याच मतदारसंघातून निवडून आलेत. विरोधी बाकावर असताना त्यांना या उद्यानाविषयी प्रेत होते. ते यासाठी सत्तापक्षावर आकाडतांडव करायचे. पण हल्ली ते राज्याच्या कारभारात व्यस्त आहेत. उद्यानाच्या विकाससंदर्भात जिल्हाधिकारी व नियोजन अधिकाऱ्यांसोबत केवळ बैठका घेण्यापलीकडे काहीच फलीत नाही. प्रशासकीय यंत्रणा संवेदनशून्य दिसत आहे. उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. प्रत्यक्षात या उद्यानाचा विकास व्हावा ही मानसिकताच दिसून येत नाही.
आतापर्यंत राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झाला. मात्र या खर्चाचा कोणी वालीच नाही. वारेमाप खर्च केला जातो. पण झालेल्या कामाचे योग्य मुल्यांकन सुद्धा होत नाही. डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पर्यटन विकास समितीने उपोषण करण्याचे पत्र दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून एक महिन्याच्या आत कामे पूर्ण करुन घेण्याचे आश्वासन दिले व उपोषण न करण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत एक सभा लावली. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकार्पणाचे आश्वासन दिले. आजमितीस ८ महिन्यांचा कालावधी लोटला पण लोकार्पण झालेच नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय पर्यटन समिती आहे. त्या समितीच्या पर्यटनसंदर्भात बैठका होतात. या ठिकाणी गार्डन तयार करण्यात आले, त्यावर सुमारे ७८ लाख रुपयांचा खर्च झाला. पाच वर्षापासून या बगिच्यात एकही फुलझाड लागले नाही. या बगिच्याचे प्रवेशद्वार गेल्या पाच वर्षापासून कुलूपबंदच आहे. तो संपूर्ण बगिचा भग्नावस्थेत आहे. संबंधित कंत्राटदाराकडून आम्ही अमक्या तारखेपर्यंत काम करुन घेतल्यानंतर लगेच लोकार्पण करु असा ठराव घेण्यात आला आहे, तसे संबंधितांना निर्देश देण्यात आले. मात्र अद्याप कुठलीच कृती झालेली नाही. याच गार्डनमध्ये स्टेप गार्डन आहे. यावर २२ लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र या उद्यानात कुठेच स्टेप गार्डन असल्याचे दिसते. संगित फवारे कार्यान्वित होऊ शकले नाही. विद्युतीकरणावर आठ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला मात्र एकही दिवा येथे जळत नाही. कंत्राटदाराला बिलाची संपूर्ण राशी दिल्याचे सांगितले जाते. केवळ अनामत रक्कम शिल्लक आहे. काम पूर्ण झाल्याचे कंत्राटदार सांगतो. तुम्ही आपल्या ताब्यात हा गार्डन घेवून लोकार्पण करा असे सांगतो, मग चार वर्षापूर्वीपासून लोकार्पणाची प्रतीक्षा का? यात मोठा घोळ आहे.