तीन राज्यातील राख्या गोंदियात दाखल
By Admin | Updated: August 23, 2015 00:10 IST2015-08-23T00:10:37+5:302015-08-23T00:10:37+5:30
भाऊ-बहिणीच्या प्रेमाला घट्ट करणारा राखीचा सण आता अवघ्या सात दिवसांवर आला आहे.

तीन राज्यातील राख्या गोंदियात दाखल
बाजारपेठ सजली : कलात्मक राख्यांसह कार्टुन्सची धूम
गोंदिया : भाऊ-बहिणीच्या प्रेमाला घट्ट करणारा राखीचा सण आता अवघ्या सात दिवसांवर आला आहे. गोंदियाच्या बाजारात पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्यप्रदेशातील विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठ राख्यांच्या दुकानांनी सजली असून त्यातील विविध प्रकारच्या राख्या महिला वर्गाचे लक्ष वेधून घेत आहे.
सुरक्षेचे वचन देणाऱ्या भावाच्या हाताला राखी बांधून बहिण आपली माया प्रकट करते. रेशमाचा साधा दोरा यासाठी पूरेसा असला तरिही काळानुसार राखीच्या प्रकारांत बदल होत गेला आहे. दरवर्षी नवनवीन प्रकारच्या राख्या बाजारात येतात. पैशांकडे न बघता बहिणी आपल्या भावासाठी चांगल्यात चांगली राखी खरेदी करतात. यामुळेच राख्यांचे निर्मातेही दरवर्षी वेगवेगळ््या प्रकारच्या राख्या बाजारात मांडतात.
गोंदियाच्या बाजारात नानाविध राख्या दिसू लागल्या आहेत. त्यांचे खरेदीदारही काही कमी नाहीत. बाजारात येणाऱ्या नव्या व्हेरायटींची त्यांच्याकडून मागणी असते. यामुळेच नवनवीन प्रकारच्या राख्या विक्रेते आणत आहेत. आता पर्यंत कलकत्ताची राखी शहरात दिसत होती. मात्र त्याहून वेगळी व्हेरायटी मिळावी यासाठी गुजरात व इंदौरच्या राख्या यंदा विक्रीसाठी आणल्याचे येथील राखी विक्रे ते आशिष जुनघरे यांनी लोकमतला सांगीतले.
तसेच सध्या बाहेरगावी पाठविण्यासाठी राख्या खरेदी केल्या जात असून राखीच्या एक-दोन दिवसांपूर्वी व्यापार वाढणार असल्याचे विक्रेते सांगत आहेत. (शहर प्रतिनिधी)