नगरपंचायत कार्यालयाला नगरसेवकांनी लावले कुलूप
By अंकुश गुंडावार | Updated: May 11, 2023 18:45 IST2023-05-11T18:44:01+5:302023-05-11T18:45:15+5:30
Gondia News अर्जुनी मोरगाव मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणे व निकृष्ठ सिमेंट रस्ते बांधकामाच्या केलेल्या तक्रारीत सापत्न वागणुक दिली. याविरोधात नगरसेवकांनी गुरुवारी (दि.११) नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

नगरपंचायत कार्यालयाला नगरसेवकांनी लावले कुलूप
अंकुश गुंडावार
गोंदियाः अर्जुनी मोरगाव मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणे व निकृष्ठ सिमेंट रस्ते बांधकामाच्या केलेल्या तक्रारीत सापत्न वागणुक दिली. याविरोधात नगरसेवकांनी गुरुवारी (दि.११) नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. बांधकाम सभापती व नगरसेवकांवर ही वेळ यावी याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
अर्जुनी मोरगाव येथे शासकीय जमिनींवर अतिक्रमणाचे प्रस्थ वाढले आहे. गेल्या आठवड्यात प्रभाग ३ मध्ये दोघांचे अतिक्रमण कोणतीही पूर्वसूचना न देता पाडण्यात आले. मात्र प्रभाग ६ चे रहिवासी हुसेन ब्राह्मणकर यांचे बांधकाम सुरू आहे. याची बांधकाम सभापती सागर आरेकर यांनी मुख्याधिकाऱयांना लेखी सूचना देऊनही कारवाई केली जात नाही. याविरुद्ध त्यांनी नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.
गुरुवारी कुलूप ठोकण्यापूर्वी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी किशोर बागडे यांनी नगरसेवकांना तहसील कार्यालयात येण्याची सूचना केली. त्यांनी जाण्यास नकार दर्शविल्याने ते स्वतः नगरपंचायत कार्यालयात आले. त्यांनी यासंदर्भात सर्व कागदपत्रांची शहानिशा केली. ब्राह्मणकर यांना नगरपंचायतच्यावतीने १८ मे पर्यंत अतिक्रमण काढून घेण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. त्यांनी स्वतः अतिक्रमण काढले नाही तर १९ मी रोजी नगरपंचायत काढेल अशी ग्वाही दिली. यावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. हेतुपुरस्सर नगरपंचायतने अधिक कालावधी दिल्याने अतिक्रमणधारक न्यायालयातून कारवाईवर स्थागनादेश आणू शकतो अशी शक्यता नगरसेवकांनी व्यक्त केली. यावर लगेच कॅव्हेट दाखल करण्याची सूचना तहसीलदारांनी केली. यावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशव्दाराला कुलूप ठोकले.