श्रीरामनगरवासीयांचे आंदोलन तिसऱ्याही दिवशी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:47 IST2019-02-28T00:46:43+5:302019-02-28T00:47:28+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

श्रीरामनगरवासीयांचे आंदोलन तिसऱ्याही दिवशी सुरूच
या आहेत प्रमुख मागण्या
कवलेवाडा, कालीमाती, झंनकारगोंदी येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना प्रती कुटुंब १० लाखाऐवजी ८ लाख रुपये देण्यात आले. यातील कपात केलेली रक्कम देण्यात यावी. सर्व आदिवासी व इतर नागरिकांना प्रती कुटुंब १ हेक्टर जमीन देण्यात यावी. २०१२-१३ मध्ये ज्या मुला-मुलींना १८ वर्षे पूर्ण होत आहे अशा मुला मुलींना १८ पुनर्वसनाचा मोबदला देण्यात यावा. या तीन्ही गावातील शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींना प्रकल्पग्रस्तांचा दाखला देण्यात यावा. या तीन्ही गावातील प्रत्येक कुुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री ते वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते. मात्र प्रशासन व शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. परिणामी श्रीरामनगर येथील व पूर्वाश्रमीच्या कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारपासून (दि.२५) गावाकडे जाणाºया मार्गावरील जंगलातच आंदोलन सुरू केले आहे. आज (दि.२७) तिसºया दिवशी सुध्दा त्यांचे आंदोलन सुरूच होते.
गावकऱ्यांचा संताप लक्षात घेता वनविभागाने घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावाकडे जाणाºया जंगलातील प्रवेशव्दारावर ताराचे कुंपन वनविभागाने तयार करुन गावकऱ्यांना या गावामध्ये जाण्यापासून रोखून धरले आहे. मात्र श्रीेरामनगरवासीय सुध्दा आपल्या मागणीवर ठाम असून जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोमवारपासून श्रीरामनगरवासीयांचा मुक्काम याच ठिकाणी आहे.
मागील दोन दिवसांपासून श्रीरामनगरवासीय आपल्या मुलांबाळांसह याच ठिकाणी तळ ठोकून असून याच ठिकाणी स्वंयपाक करीत आहे. त्यामुळे वनविभागासह पोलीस प्रशासनाची सुध्दा चांगलीच अडचण झाली आहे. या ठिकाणी सुमारे तीनशे पोलीस व वनविभागाचे शंभरावर कर्मचारी तैनात करण्यात आले.आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असून सुध्दा प्रशासनाने श्रीरामनगर वासीयांच्या मागण्यां पूर्ण न केल्याने या गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे.
६०० नागरिकांचा समावेश
श्रीरामनगर येथील महिला आणि पुरूषांनी आपल्या लहानग्या बाळांना घेवून आपल्या जंगलात असलेल्या गावाकडे निघाले होते. मात्र निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने रस्ता अडवून धरला. त्यामुळे या ६०० गावकऱ्यांनी जंगलातील या मार्गावरच आपला मुक्काम ठोकला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
श्रीरामनगरवासीयांनी सोमवारपासून आपल्या कुटुंबीयांसह जंगलात आंदोलन सुरू केले आहे. यापैकी अनेक कुटुंबात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा सुध्दा समावेश असून ते मागील तीन दिवसांपासून शाळेत गेले नाही. परिणामी त्यांचे सुध्दा शैक्षणिक नुकसान होत आहे.
गावकऱ्यांसह पोलिसांचाही मुक्काम
जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका श्रीरामनगर येथील गावकऱ्यांनी घेतली आहे.त्यामुळे ते सोमवारपासून (दि.२५) जंगलातच तळ ठोकून बसले आहेत. यामुळे त्यांचा याच ठिकाणी मुक्काम असून या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त व वनविभागाचे कर्मचारी तैनात आहे. परिणामीे गावकऱ्यांसह पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा मुक्काम सुध्दा जंगलातच आहे.