महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:42+5:302021-01-14T04:24:42+5:30
गोंदिया : जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनात सन २०१९ च्या तुलनेत सन २०२० मध्ये ११ गुन्ह्यांनी घट झाली ...

महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले
गोंदिया : जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनात सन २०१९ च्या तुलनेत सन २०२० मध्ये ११ गुन्ह्यांनी घट झाली आहे. सन २०२० मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या १२ तक्रारींची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या १२ पैकी ३ हल्ले पोलिसांवरील आहेत. सर्वाधिक हल्ले हे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर झाले आहेत.
सन २०१९ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याचे २३ गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. परंतु सन २०२० मध्ये १२ गुन्हे दाखल झाले असून, ११ गुन्ह्यांनी घट झाली आहे. २०१९ मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याचे आठ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर सन २०२० मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. दाखल झालेल्या १२ गुन्ह्यांपैकी ११ गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. गोंदिया जिल्ह्यात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याने, त्या रेतीमाफियांवर अंकुश लावण्यासाठी जाणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रेतीमाफियांनी हल्ले केले.
बॉक्स
११ गुन्ह्यात कारवाई
जिल्ह्यात सन २०२० मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे १२ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात ११ प्रकरणातील आरोपींना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. सन २०१९ मध्ये ३१ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातुलनेत सन २०२० मध्ये ४८ टक्के गुन्हे कमी घडले आहेत.
बॉक्स
महसूल विभागाला केले टार्गेट
रेतीमाफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले नेहमीच होत असतात. रात्रीच्या वेळी अवैध रेतीची वाहतूक करून मोठी मिळकत मिळविणारे रेतीमाफिया अधिक नफा मिळविण्याच्या नादात महसूल विभागाला टार्गेट करीत आहेत.