बंधाऱ्यांत जिरतोय पैसा

By Admin | Updated: March 28, 2017 00:50 IST2017-03-28T00:50:36+5:302017-03-28T00:50:36+5:30

वाढत्या लोकसंख्येसोबतच पाण्याचा वापरही वाढत चालला आहे. यामुळे आता भुगर्भातील पाणीही खेचून काढले जात असून तेच पाण्याचे मुख्य स्त्रोत ठरत आहे.

Mortgage money | बंधाऱ्यांत जिरतोय पैसा

बंधाऱ्यांत जिरतोय पैसा

बंधारे ठरताहेत शोभेचे : अधिकाऱ्यांची मनमर्जी, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सौंदड : वाढत्या लोकसंख्येसोबतच पाण्याचा वापरही वाढत चालला आहे. यामुळे आता भुगर्भातील पाणीही खेचून काढले जात असून तेच पाण्याचे मुख्य स्त्रोत ठरत आहे. यामुळे मात्र भुगर्भातील पाण्याची पातळी घसरत चालली आहे. पाण्याची ही समस्या लक्षात घेत शासनाकडून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ अभियान राबविले जात आहे. यात शेत तळी, वनराई बंधारे, सिमेंट बंधारे आदिंच्या माध्यमातून पाणी अडवून जिरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या बंधाऱ्यांत पाणी दिसून येत नाही. अशात लाखो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या बंधाऱ्यांत पाणीच जिरतेय असे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
पाणी अडवा ही मोहिम जरी जुनी असली तरी जे सरकार येते ते आपल्या पद्धतीने त्याचे नामकरण करते. ही मोहिम जिल्ह्यातील शासकीय कार्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते व त्यावर लाखो रूपयांची कामे केली जातात. मात्र कंत्राटदारांकडून तयार करण्यात आलेले बंधारे निरूपयोगी ठरत आहेत.
निकृष्ट बांधकामांमुळे काही ठिकाणी बंधारेच वाहून गेल्याचेही प्रकार घडले आहेत. मात्र या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी कुणालाही वेळ नाही. त्यामुळे या मोहिमेचा फज्जा उडाला आहे.
बंधाऱ्यांचे कंत्राट मर्जीतील व्यक्तींना दिले जातात. त्यामुळे ते राजकीय अभय असल्याच्या अविर्भावात निकृष्ट साहित्याचा वापर करून माया जमवितात. मात्र त्या पलीकडे समाजासाठी काहीच केल्याचे दिसून येत नाही. काही ठिकाणी तर लोकप्रतिनिधीच कामे करीत असून नाव फक्त दुसऱ्याचे असल्याचे दिसून येते. यातूनच निकृष्ट दर्जाच्या कामांना सुरूवात होते. बांधकामाच्या कामात सर्वांचेच कमिशन राहात असल्याचे बोलले जाते. अशात बांधकामाचा दर्जाही कसा राहणार? याचा अंदाज येतो.
त्यामुळे जिल्ह्यात जे बंधारे निकृष्ट दर्जाचे प्रतीक असतील त्यांची दुरूस्ती करणे व नव्याने बांधकाम होत असलेल्या बंधाऱ्यांची कंत्राटदाराकडूनच ५-१० वर्षांपर्यंत देखरेख असावी, असा नियम करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा जलसंधारणाच्या योजना फसत जातील.
याकडे वरिष्ठ जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा पाणी टंचाईची झळ वाढतच जाणार व एकेकाळी पाण्यापुढे रक्त स्वस्त होणार. त्यामुळे पाण्याचे वेळीच नियोजन करणे हाच एकमेव उपाय आहे. (वार्ताहर)

नदीच केली कोरडी
येथील चुलबंद नदीवर दोन बंधारे आहेत. मात्र दोन्ही निकामी आहेत. यात सौंदड ते राका मार्गावर कोल्हापूरी बंधारा असून स्मशानभूमी पाणीटंकीजवळ बंधारा आहे. यावर शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र आज बंधाऱ्यांत पाणीच नसून परिसरातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनप्रतिनीधी व वाळूमाफीयांच्या संगनमताने नदीला कोरडे करण्यात आले आहे.

Web Title: Mortgage money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.