शाळा-महाविद्यालयात हवी मोबाईल बंदी
By Admin | Updated: June 25, 2014 23:51 IST2014-06-25T23:51:40+5:302014-06-25T23:51:40+5:30
अलीकडच्या काही वर्षात प्रत्येकाच्या हातात दिसणारे मोबाईल आता चक्क विद्यार्थ्यांच्या हातातही दिसत आहेत. या मोबाईल संस्कृतीमुळे शाळा व महाविद्यालयांचे पावित्र्य धोक्यात आले असून

शाळा-महाविद्यालयात हवी मोबाईल बंदी
गोंदिया : अलीकडच्या काही वर्षात प्रत्येकाच्या हातात दिसणारे मोबाईल आता चक्क विद्यार्थ्यांच्या हातातही दिसत आहेत. या मोबाईल संस्कृतीमुळे शाळा व महाविद्यालयांचे पावित्र्य धोक्यात आले असून शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी अध्ययनाऐवजी मोबाईलवर टवाळखोरीच अधिक करीत असतात. यामुळे शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी ठेवण्याची गरज आहे.
महाविद्यालयात मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णयावर सध्या शासन दरबारी विचारविनीमय सुरू आहे.
शाळा व महाविद्यालये ही विद्या ग्रहण करण्याची मंदिरे आहेत. ज्याप्रमाणे मंदिराचे पावित्र्य कायम ठेवण्याकरिता मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तशीच बंदी विद्येच्या मंदिराचे पावित्र्य कायम ठेवण्याकरिता लागू करण्यात यावी, असे शहरातील अनेक नागरिकांचे मत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून मोबाईल संस्कृती रुजू झाली आहे. या संस्कृतीचे सर्वाधिक लोण शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरले आहे. काही पालकांनी आपल्या पाल्याशी शाळा व महाविद्यालयात गेल्यावर त्यांची माहिती सहजपणे मिळावी या काळजीपोटी मोबाईल घेवून दिले आहे. काही विद्यार्थ्यांनी मोबाईल ही आजच्या पिढीची गरज बनली असून ते आपल्याकडे असायलाच हवे, असा समज करुन मोबाईलचा वापर सुरू केला आहे. त्यातच मोबाईलवरुन फेसबुक, वॉटसअॅप व चॅटींग करता येत असल्याने बहुतके विद्यार्थी आपला अभ्यास बाजूला करुन मोबाईलशी खेळण्यातच व्यस्त असतात. काही ठिकाणी वर्गात मोबाईल नेण्यास बंदी असताना देखील विद्यार्थी मोबाईल सायलेन्ट ठेऊन चॅटींग करीत असतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासात लक्ष नसते, असा अनुभव अनेक शिक्षकांचा आहे.
काही विद्यार्थ्यांना मोबाईलमुळे वाईट सवयी जडत आहेत. कुठल्याही गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात. तीच बाब मोबाईलची आहे. मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करणारे विद्यार्थी कमी आहेत. हे विद्यार्थी मोबाईलचा वापर केवळ चॅटिंग करण्याकरिता न करता ते त्यातून अभ्यासपूर्ण गोष्टींचा शोधही घेत असतात. वर्गात बसल्यानंतर ते आपला मोबाईल बंद करुन ठेवतात. शाळा व महाविद्यालयात मोबाईल वापरावर बंदी नसावी असे काही विद्यार्थ्यांना वाटते. सात ते आठ तास घराबाहेर विद्यार्थी असल्यामुळे घरची माहिती मिळत राहावी यासाठी मोबाईल उपयुक्त असल्याचे सांगितले. आपल्याकडे मोबाईल असल्याने आपल्या पालकांशी वेळीच संपर्क साधून माहिती घेता येते. शिवाय मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधा असल्याने एखाद्या विषयाची माहिती देखील त्यातून सहज मिळविता येते. त्यामुळे महाविद्यालयात मोबाईल वापरण्यावर बंदी नसावी, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी अजय बघाडे यांनी दिली.
काही विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालयात मोबाईल वापरण्यावर बंदी असावी अशी प्रतिक्रिया दिली. त्यामागील कारण देताना त्यांनी आपण शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता जात असतो. आज प्रत्येक महाविद्यालयात टेलिफोनची सुविधा आहे. त्यामुळे एखाद्या पालकाला आपल्याशी संपर्क साधायचा झाल्यास ते महाविद्यालयाच्या टेलिफोनवर संपर्क साधू शकतात. मोबाईलमुळे वर्गातील शांतता भंग होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष न लागता ते मोबाईवरच व्यस्त असतात. मोबाईलचा वापर आज वाईट कामाकरिताच जास्त केला जात असून त्यामुळे विद्येच्या मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले, असे काही विद्यार्थ्याना वाटते. ते कायम ठेवण्यासाठी शाळा व महाविद्यालयात मोबाईल वापरण्यावर बंदी असावी अशी प्रतिक्रिया आहे.
गोंदिया शहरात १६ कनिष्ठ व १० वरिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी काही महाविद्यालयात विद्यार्थी व प्राध्यापकांना वर्गात मोबाईल वापरण्याकरिता बंदी लागू केली आहे. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मतानुसार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी असावीच. मोबाईलमुळे अध्ययन कार्यात अडचण निर्माण होत असतो. तसेच शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होत नाही. काही विद्यार्थी याचा गैरवापर करित असल्याने महाविद्यालयाची आचारसंहितादेखील भंग होत असल्याचे म्हणणे आहे.
पालकांना कितीही आपल्या पाल्यांची काळजी असली तरी मुले घराबाहेर पडल्यानंतर मोबाईलवर नेमके काय करीत असतात याची माहिती नसते. मोबाईलवर फेसबुक, चॅटींग अशा सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलांना वाईट सवयी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी अध्ययन करण्याकरिता जातात. एकंदरीत विद्यार्थी, पालक, महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांच्या प्रतिक्रियांवरुन विद्येच्या मंदिराचे पावित्र्य व शैक्षणिक वातावरण ठेवण्यासाठी महाविद्यालयात मोबाईल वापरण्यावर बंदी असावी.(तालुका प्रतिनिधी)