आमदारसाहेब, ग्रा.पं.कन्हारपायलीची समस्या सुटणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:30+5:302021-02-05T07:46:30+5:30
सडक-अर्जुनी : तालुक्यातील जि.प. क्षेत्र शेंडा परिसरात असलेल्या कन्हारपायली या लहानशा गावाला चारही बाजूने समस्यांनी घेरले आहे. या क्षेत्राचे ...

आमदारसाहेब, ग्रा.पं.कन्हारपायलीची समस्या सुटणार का?
सडक-अर्जुनी : तालुक्यातील जि.प. क्षेत्र शेंडा परिसरात असलेल्या कन्हारपायली या लहानशा गावाला चारही बाजूने समस्यांनी घेरले आहे. या क्षेत्राचे आ.मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी या गावाकडे लक्ष दिल्यास काही प्रमाणात समस्या सुटतील अशी गावकऱ्यांना आशा आहे.
ग्रामपंचायत कन्हारपायली अंतर्गत कन्हारपायली, सालईटोला,पाटीलटोला व पानरगोटा ही गावे येतात. उशीखेडा ग्रा.पं.अंतर्गत उशीखेडा, मोहघाटा व टेकरी ही गावे आहेत. या गावात जवळपास अडीच हजार मोबाईलधारक आहेत. परंतु कंपनीचे टाॅवर नाहीत व नेटवर्क नाहीत. यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. आजच्या तांत्रिक युगात या गावातील लोकांचा मोबाईलवर संपर्क होत नाही. कन्हारपायली ते पाटीलटोला या २ किमी रस्त्याची फारच दुर्दशा झाली आहे. कन्हारपायली ते पातरगोटा व कन्हारपायली ते उशीखेडा हे अंदाजे २ किमीचा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. तसेच नाल्यांची व्यवस्था नाही. गावात बेरोजगार लोकांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांच्या हाताला काम नाही. रोजगार हमी योजना तसेच इतरही शासकीय योजना सुरु झाल्यास नागरिकांच्या हाताला काम मिळेल व समस्या सुटतील त्यामुळे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
....
कोट :
आजच्या काळात रोड, रस्ते, नाल्या, भ्रमणध्वनी व रोजगार आवश्यक आहेत. परंतु त्यापासून आम्ही वंचित आहोत. कन्हारपायली परिसरातील समस्या सुटाव्या ही अपेक्षा आहे.
- मिलिंद मेश्राम, गावकरी कन्हारपायली