बेपत्ता युवकाचा मृतदेह तलावात आढळला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST2021-04-10T04:28:43+5:302021-04-10T04:28:43+5:30
देवरीच्या परसटोला प्रभाग क्रमांक १ येथील रहिवासी आतिश प्रल्हाद मडावी (२४) हा ७ एप्रिलला पहाटे ३ वाजता घरून निघाला ...

बेपत्ता युवकाचा मृतदेह तलावात आढळला ()
देवरीच्या परसटोला प्रभाग क्रमांक १ येथील रहिवासी आतिश प्रल्हाद मडावी (२४) हा ७ एप्रिलला पहाटे ३ वाजता घरून निघाला होता. पायाला अपघातात झालेली जखम व पोटाच्या आजाराने तो त्रस्त असल्याचे बोलल्या जाते. आतिशचा शोध घेण्याकरिता त्याच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी आजूबाजूच्या जंगलात शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागला नव्हता. त्यामुळे ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता त्याच्या लहान भावाने पोलीस स्टेशन देवरी येथे भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, ८ एप्रिल रोजी पाण्याने भरलेली बॉटल परसटोलाच्या तलावाजवळ आढळली. ती बॉटल आतिशच्या घरचीच असल्याचे त्याच्या भावाने पोलिसांना कळविले. देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांना सामाजिक कार्यकर्ता विलास शिंदे यांनी घटनास्थळी बोलावून माहिती दिली. त्यावर तहसीलदारांनी आपत्ती व्यवस्थापन गोंदियाच्या चमूला बोलाविले. शोध बचाव पथकाने तीन तास तलावात शोध घेतला, परंतु मृतदेह सापडला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी शोध बचाव पथक येण्यापूर्वी मृतदेह तलावाच्या कडेला तरंगताना नागरिकांना आढळला. देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत.