चंद्रपुरातून बेपत्ता जगदीशचा मृतदेह विहिरीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 05:00 IST2020-03-16T05:00:00+5:302020-03-16T05:00:06+5:30
माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरापासून ते या केंद्रात उपचार घेत होते. उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात ते कामही करायचे.

चंद्रपुरातून बेपत्ता जगदीशचा मृतदेह विहिरीत सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश गोपाळा डोंगरवार (४०) यांचे प्रेत विहिरीत सापडल्याने गावात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, मृत जगदीश बुधवारपासून (दि.११) चंद्रपुर येथून बेपत्ता होते.
येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरापासून ते या केंद्रात उपचार घेत होते. उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात ते कामही करायचे. नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.११) सकाळी १० वाजता जगदीश कामावर गेले. परंतु नेहमीच्या वेळेवर ते व्यसनमुक्ती केंद्रात रात्री पोहोचले नाही. तेव्हा व्यसनमुक्ती केंद्रातून येथील त्यांच्या कुटुंबियांना गुरु वारी (दि.१२) ते बेपत्ता असल्याचे कळविण्यात आले. जगदीश घरी सुद्धा आले नाही यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.
तेव्हा त्यांची पत्नी केशर डोेंगरवार यांनी आपल्या वडिलांसोबत चंद्रपूरला जाऊन शनिवारी (दि.१४) शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली व त्या रात्री घरी परतल्या. मात्र रविवारी (दि.१५) माऊली मोहल्ल्यातील एक महिला पाणी भरण्यासाठी सकाळी ६ वाजतादरम्यान विहिरीवर गेली असता त्यांना मृतदेह तरंगतांना दिसला. याची माहिती तिने परिसरातील लोकांना दिली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर यांनी पोलिसांना माहिती दिली व उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले असता चंद्रपुर येथून बेपत्ता जगदीश डोंगरवार यांचे मृतदेह असल्याची खात्री पटली. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. बुधवारी सायंकाळी सौंदड येथे तसेच गुरूवारी देवलगाव रेल्वे स्थानकावर जगदीशला काहींनी बघितल्याचे सांगितले जाते. केशर डोंगरवार यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
जगदीश डोंगरवारचे वडील गोपाळा डोंगरवार हे येथील श्रीकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळाचे व्यवस्थापक होते. बालपणापासूनच वडिलांच्या नाटकाशी असलेल्या संबंधामुळे जगदीशलाही नाटकाचे वेड लागले. नाटकाच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा असे. अनेक नाट्यप्रयोगाचे त्यांनी आयोजन केले होते. त्यांच्या नाट्यप्रेमासाठी जगदीश नवेगावबांधवासियांच्या नेहमीच लक्षात राहतील.