छत्तीसगडमधून मजुरांचे स्थलांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:13+5:30
बस व रेल्वेसह खाजगी वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांचे हाल झाले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचा कुणीही वाली नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांवर संकट कोसळले आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मजुरांना आता घराकडची ओढ लागल्याने कुम्हारी (दुर्ग) छत्तीसगढ ते कटंगी (जि.बालाघाट) मध्यप्रदेश हा अडीशे कि.मी.चा पायी प्रवास करण्याची वेळ मजुरांवर आली आहे.

छत्तीसगडमधून मजुरांचे स्थलांतरण
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ केला आहे. परिणामी बस व रेल्वेसह खाजगी वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांचे हाल झाले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचा कुणीही वाली नाही. लॉकडाऊनमुळे मजुरांवर संकट कोसळले आहे. रोजगारासाठी बाहेर गेलेल्या मजुरांना आता घराकडची ओढ लागल्याने कुम्हारी (दुर्ग) छत्तीसगढ ते कटंगी (जि.बालाघाट) मध्यप्रदेश हा अडीशे कि.मी.चा पायी प्रवास करण्याची वेळ मजुरांवर आली आहे.
गोंदिया, भंडारा, गडचिरोली व मध्यप्रदेशातील छिंदवाडा, बालाघाट येथील मजूर रायपूर, दुर्ग, भिलाई येथे रोजगारासाठी जातात. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे.त्यामुळे छत्तीसगढ राज्यात अनेक ठिकाणी मजूर अडकले आहेत. बस सेवा, रेल्वे व खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे आपले गाव कसे गाठावे असा प्रश्न मजुरांना पडला आहे.
अशीच वेळ मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कटंगी व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील दहा मजुरांवर आली. कटंगी येथील ८ मजूर कामानिमित्त कुम्हारी (दुर्ग) येथे होते. त्या मजुरांनी साधना अभावी पायपीट करीत सोमवारी (दि.३०) सकाळी नऊ वाजता डोंगरगढ, धानोली रेल्वे मार्गे आमगाव येथे दाखल झाले. रेल्वे मार्गाने पायपीट करताना त्यांना रात्री रेल्वे स्टेशनवर थांबण्यास मज्जाव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी २७ मार्चपासून प्रवास सुरू केला होता. कुम्हारी ते कटंगी हा २५० कि.मी.चा रस्ता पार करायचा होता. परंतु आमगाव येथे पोचल्यानंतर मजुरांची व्यथा बघून येथील अष्टविनायक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचा परिचय देत मदत केली. मजुरांना फळ बिस्कीटांचे वितरण केले. त्यानंतर पुन्हा या मजुरांनी आपला मोर्चा कटंगीकडे वळविला.
अशीच स्थिती आमगाव तालुक्यातील बोथली व किडंगीपार येथील दोन मजुरांची झाली. ते रायपूर येथे मजुरी करण्यासाठी गेले होते.मात्र कोरोनामुळे तेथील काम बंद झाल्याने गावाकडे परतत आहे.यात कैलास भलावी, अतुल परते, रोहित पांढरे, सुरेंद्र पांढरे, गोविंद मरकाम, रवींद्र तुमळाम, उमेश कोकोडे, अरूण कोडवते यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या लढाईत सर्वत्र शुकशुकाट
आमगाव : देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. यामुळे नागरिक आपल्या घरात असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. येथील दवाखाना व औषधी दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद असल्याचे दिसून आले. शासनाने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही अत्यावश्यक साहित्यांसाठी किराणा दुकाने सुरु आहे. मात्र नागरिकांकडून गर्दी केली जाणार नाही त्यासाठी प्रत्येक दुकानासमोर मार्र्कींग करुन ग्राहकांसाठी १-१ मिटर अंतरावर उभे राहण्यासाठी चौकोन करण्यात आले आहेत.