मेडिकलचे कोविड केअर सेंटर भगवान भरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
कोरोना बाधित रुग्णांना शहरातील विविध चार कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.अधिक गंभीर असलेल्या रुग्णांना मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. या ठिकाणी दाखल रुग्णांवर वेळीच उपचार आणि सोयी सुविधा मिळण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांना दाखल केल्यानंतर वेळेत औषधे, पोष्टीक जेवण, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ ब्लाँकेट व चादरी देण्याची गरज आहे.

मेडिकलचे कोविड केअर सेंटर भगवान भरोसे
रुग्णांना साधे पाणी मिळेना : इम्युनिट वाढविणाऱ्या गोळ्या खा आणि रहा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना बाधित गंभीर असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना साधे पाणी सुध्दा मिळत नसल्याची बाब पुढे आली. येथे दाखल असलेल्या रुग्णांना केवळ इम्युनिटी वाढविणाऱ्या चार गोळ्या खा आणि राहा ऐवढेच उपचार केले जात आहे.त्यामुळे मेडिकलचे कोविड केअर सेंटर भगवान भरोसे असून दिव्याखालीच अंधार असल्याची स्थिती आहे.
कोरोना बाधित रुग्णांना शहरातील विविध चार कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.अधिक गंभीर असलेल्या रुग्णांना मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. या ठिकाणी दाखल रुग्णांवर वेळीच उपचार आणि सोयी सुविधा मिळण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नसल्याचे चित्र आहे. रुग्णांना दाखल केल्यानंतर वेळेत औषधे, पोष्टीक जेवण, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ ब्लाँकेट व चादरी देण्याची गरज आहे. एखाद्या रुग्णाला छातीत दुखत असेल तर त्याची वेळीच तपासणी करुन उपचार होणे गरजेचे आहे. पण मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमध्ये या सर्व सुविधांचा अभाव आहे. रुग्णांना साधे पिण्याचे पाणी मिळत नसेल तर बाकी सुविधांचा विचार न केलेला बरा अशी स्थिती आहे. ब्लाँकेट आणि चादरींची अवस्था पाहिली तर रुग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडेल अशी स्थिती आहे. दिवसभरात रुग्णांची नियमित तपासणी सुध्दा होत नसल्याचे येथे दाखल असलेल्या एका रुग्णांने सांगितले. केवळ इम्युनिटी वाढविणाऱ्या चार गोळ्या खा आणि येथे राहा अशीच अवस्था येथील कोविड केअर सेंटरची आहे. पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरमधील सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वत:च्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. प्रत्येक केंद्रासमोर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी स्टॉफची माहिती असलेले फलक लावण्याचे निर्देश दिले. पण मेडिकलच्या कोविड केअर सेंटरमध्येच माहिती फलक लागलेले नाही. दिव्याखालीच अंधार असल्याची स्थिती आहे.
बायो मेडिकल वेस्टचा खच
शहरातील फुलचूर परिसरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधून दररोज निघणाºया बायो मेडिकल वेस्टची (जैविक कचरा) नियमित विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी या केंद्राच्या आतील भागात बायो मेडिकल वेस्टचा खच पडला आहे. परिणामी यापासूनच अधिक संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही.
कोरोना बाधितांचा मृतदेह उघड्यावरच
दोन दिवसांपूर्वीच मेडिकलमधील कोविड केअर सेंटरमधील दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार प्लास्टिकमध्ये पॅक ठेवण्याची गरज आहे. मात्र हे दोन्ही मृतदेह कोविड केअर सेंटरच्या परिसरात दोन तीन तास तसेच उघड्यावर पडले होते. यामुळे येथे दाखल असलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
असुविधांमुळेच तपासणीकडे दुर्लक्ष
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यात बऱ्याच जणांना लक्षणे दिसल्यानंतरही ते तपासणी करण्यासाठी जात नाही. कारण कोविड केअर सेंटरमधील असुविधांचा बोजवारा आणि आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष याच गोष्टी कारणीभूत ठरत आहे.तर यासाठी तयार केलेले टास्क फोर्स आणि समिती केवळ नाममात्र ठरत आहे.