लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयात एनर्जी गो स्मार्ट सर्व्हिस कंपनीअंतर्गत ५०४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून वेतन होते. याकडे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मेडिकलसमोर सोमवारी (दि.१४) आंदोलन केले. याचीच दखल घेत कंपनीने आठ दिवसांत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
मेडिकल, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयात एनर्जी गो स्मार्ट सर्व्हिस कंपनी अंतर्गत एकूण ५०४ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला १ कोटी रुपयांचा निधी लागतो. पण गेल्या पाच महिन्यांपासून कंपनी अंतर्गत कार्यरत या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले. थकीत वेतनासंदर्भात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वांरवार रुग्णालय व्यवस्थापन व कंपनीकडे पाठपुरावा केला. पण याची दखल कंपनीने न घेतल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली होती. सोमवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मजदूर सेनेच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात मेडिकलचे अधिष्ठाता यांनी सामंजस्याची भूमिका घेत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर कंपनीने आठ दिवसांत थकीत वेतन देण्याची ग्वाही कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
या होत्या प्रमुख मागण्या
- पाच महिन्यांचे थकीत वेतन त्वरित जमा करण्यात यावे
- दर महिन्याला वेतनाची पावती कर्मचाऱ्यांना द्यावी
- सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन देण्यात यावे
- सर्व कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस देण्यात यावा
- सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्र, सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्या