केटीएस-गंगाबाईच्या इमारतीत मेडिकल कॉलेज

By Admin | Updated: September 17, 2014 23:54 IST2014-09-17T23:54:49+5:302014-09-17T23:54:49+5:30

जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू होते. यावर्षी बांधकाम पूर्णत्वास आले. त्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार

Medical College in KTS-Gangabai Building | केटीएस-गंगाबाईच्या इमारतीत मेडिकल कॉलेज

केटीएस-गंगाबाईच्या इमारतीत मेडिकल कॉलेज

तीन वर्षाचा ताबा : आरोग्य संचालकांनी दिले आदेश
नरेश रहिले - गोंदिया
जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू होते. यावर्षी बांधकाम पूर्णत्वास आले. त्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार सुरू करण्याआधीच आरोग्य सेवा संचालनालयाने पत्र पाठवून केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाची नवीन इमारत तीन वर्षासाठी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी देण्यात यावी असे पत्र दिले आहे. त्यामुळे गंगाबाई व केटीएसच्या नवीन इमारतीत मेडिकल कॉलेजचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू होणार आहे.
केटीएसच्या नवीन इमारतीचे काम तीन टप्प्यात करण्यात आले. हे काम ८ वर्षांपासून करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय पूर्वी १८० खाटांचे होते, मात्र २०० खाटा ठेवण्यासाठी अपुरी व्यवस्था होत असल्यामुळे केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन इमारत बांधकाम करण्यात आले. नवीन इमारतीत जिल्हा शल्यचिकित्सक यांचा कक्ष, प्रशासकीय कामकाजासाठी लिपिकांच्या खोल्या, सभागृह, रुग्णांसाठी प्रतीक्षालय ठेवण्यात येणार होते. परंतु या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी केटीएस व गंगाबाईमध्ये उभारण्यात आलेल्या दोन्ही इमारती मेडिकल कॉलेजसाठी देण्यात याव्या, असे पत्र आरोग्य सेवा संचालनालयाने २६ जून २०१४ रोजी दिले आहे.
तीन वर्षासाठी मेडिकल कॉलेज या दोन्ही इमारतीत सुरू राहणार आहे. या कॉलेजसाठी कुडवा येथे १० हेक्टर जागा प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी बांधकाम झाल्यावर केटीएस व गंगाबाई रुग्णालयाची इमारत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधीनच राहणार आहे. तीन वर्षानंतर मेडिकल कॉलेज कुडवा येथे सुरू होणार आहे. डॉ.केवलीया यांची प्रभारी अधिष्ठाता म्हणून तर प्रशासकीय अधिकारी म्हणून देशपांडे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. इतरही पदभरती लवकरच करण्यात येणार आहे.
मेडिकल कॉलेज सुरू करण्यात यावे यासाठी मेडिकल कॉन्सील आॅफ इंडियाची चमू तपासणीसाठी न आल्यामुळे आ.गोपालदास अग्रवाल यांंनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका टाकली होती. ५०० खाटांच्या क्षमतेचे मेडीकल कॉलेज गोंदियात सुरू होणार आहे. यंदापासून मेडिकल कॉलेज केटीएस व गंगाबाई रुग्णालयाच्या इमारतीत सुरू करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने गोंदिया येथील आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील केटीएस व बीजीडब्ल्यूची इमारत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

Web Title: Medical College in KTS-Gangabai Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.